चंदीगड: एकीकडे केंद्राची आणि राज्याची सुरक्षा घेण्यासाठी अनेकजण रांगेत असताना दुसरीकडे पंजाबमध्ये (Punjab Government) मात्र नेत्यांपासून धर्मगुरूंपर्यंतच्या सुरक्षा काढण्यात आल्या आहेत. पंजाबमधील भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने पाच पन्नास नव्हे तर 424 व्हिआयपींचं तात्काळ प्रभावाने संरक्षण काढून घेतलं आहे. यात राजकीय नेते, निवृत्त पोलीस अधिकारी, धार्मिक गुरुंचाही समावेश आहे. ज्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे त्यात माजी आमदार, माजी पोलीस अधिकारी आणि सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांचाही समावेश आहे. पोलीस महासंचालकांना ही सुरक्षा हटवण्याचे (Punab Security Withdrawn) निर्देश मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहेत. पंजाबच्या व्यास येथील डेरा राधा स्वामी यांच्या सुरक्षेतील 10 सुरक्षा रक्षक हटवण्यात आले आहेत. मजिठा येथील आमदार गनीव कौर मजिठिया यांच्या सुरक्षेतील दोन सुरक्षा रक्षक हटवण्यात आले आहेत.
पंजाबचे माजी डीजीपी पीसी डोगरा यांच्या सुरक्षेतील एक कर्मचारी हटवण्यात आला आहे. या पूर्वी पंजाब सरकारने एप्रिलमध्येच 184 जणांचे संरक्षण काढून घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यात माजी मंत्री आणि माजी आमदारांसह काही नेत्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे चिरंजीव रनिंदर सिंग आणि काँग्रसचे आमदार प्रतापसिंग बाजवावेरे यांची सुरक्षा हटवण्यात आली होती.
या महिन्याच्या सुरुवातीला आम आदमी पार्टीच्या सरकारने आठ लोकांची सुरक्षा काढली होती. यात अकाली दलाच्या आमदार हरसिमरत कौर बादल, पंजाबचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आदींचा समावेश होता. या आठ जणांपैकी पाच जणांना झेड सुरक्षा होती. तर तिघांना वाय प्लस सुरक्षा होती. या आठ जणांच्या सुरक्षेसाठी 127 पोलीस कर्मचारी आणि नऊ वाहने तैनात होती.
याशिवाय पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी, माजी कॅबिनेट मंत्री विजय इंजर सिंग्ला, माजी आमदार परमिंदर सिंह पिंकी, राजिंद्र कौर भट्टल, नवतेज सिंग चीमा आणि केवल सिंग ढिल्लन यांचीही सुरक्षा काढून घेतली आहे. राज्यातील व्हिआयपींची सुरक्षा काढून घेण्याची ही तिसरी वेळ आहे.