चंदीगड – प्रसिद्ध पंजाबी गायक (Punjabi Singer)सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala Murder case)याच्या हत्येची सुपारी एक कोटी (one crore rupees)रुपयांना देण्यात आली होती. यात प्रत्येत शार्प शूटरला पाच-पाच लाख रुपये देण्यात आले. इतर पैसे बाहेरुन मदत करणाऱ्यांना देण्यात आले. मुसावाला याची हत्या झाली त्यादिवशी हल्लेखोरांच्या गाडीत 10 लाखांची कॅश होती. ही कॅश कॅनाडात बसलेल्या लॉरेन्स गँगचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने पाठवलेली होती. शार्प शूटर प्रियवर्त फौजी आणि कशिश यांच्या पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. आता हे पैसे एकत्र करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
मुसेवाला याच्या हत्येसाठी परदेशातील हत्यारांचा वापर करण्यात आला. यात ऑस्ट्रियाच्या ग्लॉक पिस्तूल, जर्मनीची हेकलर एन्ड कोच पी -30 हँडगन, स्टार पिस्तूल, तुर्कीतील जिगाना सेमी ऑटोमेटिक पिस्तूल आणि एके 47 रायफलचा समावेश होता. ही हत्यारे चालवण्यापूर्वी प्रियवर्त फौजी आणि अंकिता सरेसा यांनी याचे ट्रेनिंग घेतले होते.
मोहाचा रहिवासी असलेला शार्प शूटर मनुप्रित मनु सुस्सा काही काळापूर्वी जेलमध्ये गेला होता. तिथे त्याला मारहाण झाली होती. बंबीहा गँगने ही मारहाण केल्याचा त्याला संशय होता. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता. गँगस्टर लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार यांचा नीकटवर्तीय अशी मन्नूची ओळख आहे. तो बँबीहा गँगचा बदला घेण्याच्या तयारीत होता. त्यामुळे गोल्डी ब्रारने सगळ्या शूटर्सना सांगितले होते की पहिली गोळी मनु मारेल. त्यामुळे त्याच्याकडे एके 47 रायफल देण्यात आली होती. त्याच्याच गोळीने मुसेवालाचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या मुसेवाला याच्याकडे सुरक्षा नसताना, त्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.
सिद्धू मुसेवाला याची पंजाबमध्ये मनसा येथे गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी प्रियवर्त फौजी, अंकित सेरसा आणि कुलदीप उर्फ कशीश या तिघांना अटक केली आहे. तर पंजाब पोलिसांनी या प्रकरणात रेकी करणारे, मदत करणारे आणि गाडी आणि फरार करणाऱ्या १४ जणांना अटक केली आहे. तसेच महाराष्ट्रातूनही दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या मृत्यूने पंजाबातील राजकारण आणि गुन्हेगारी विश्व ढवळून निघाले होते.