गुरुग्राम : एकीकडे भारतात घरांच्या किंमती गगनाला भिडत असताना एका ठिकाणी मात्र घरं घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. पण या घराची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. कारण या घराची किंमत तब्बल ७ कोटी रुपये होती. गुरुग्राममध्ये 7 कोटींचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या. अवघ्या 3 दिवसांत 1,137 घरांची विक्री झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख डीएलएफने गुरुग्राममध्ये एक नवीन लक्झरी प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प घर खरेदीदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
डीएलएफ कार्यालयात घर खरेदी करण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली आहे. त्याचा एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. डीएलएफ कार्यालयात शेकडो लोकांची गर्दी झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आलोक जैन नावाच्या एका ट्विटर युजरने डीएलएफ कार्यालयात रांगेत उभे असताना फोटो शेअर केला आहे.
आलोक जैन कॅप्शनमध्ये ते लिहितात की, रिअल इस्टेटमध्ये मंदी कुठे आहे? आलोक जैन हे वीकेंड इन्व्हेस्टिंगचे संस्थापक आहेत. जैन म्हणतात की, एका डीएलएफ ब्रोकरमार्फत समजले की 1,137 फ्लॅटचा संपूर्ण प्रकल्प तीन दिवसांत विकला गेलाय.
Someone sent me scenes from #DLF office where ppl are lining up to buy luxury homes worth 7 cr+
Where is the real estate slow down!!? pic.twitter.com/yLlbt6rDgB
— Alok Jain ⚡ (@WeekendInvestng) February 17, 2023
आर्बर नावाचा हा प्रकल्प 10 वर्षांनंतर डीएलएफचा उच्चस्तरीय कॉन्डोमिनियम आहे. याआधी डीएलएफचा शेवटचा प्रकल्प क्रेस्ट आणि कॅमेलियास होता. आर्बर प्रकल्पाच्या प्रत्येक फ्लॅटची किंमत 7 कोटी असल्याचे सांगितले जाते. डीएलएफचा आर्बर प्रोजेक्ट गुरुग्राममधील सेक्टर 63 मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प 25.8 एकर क्षेत्रात पसरला आहे. यात पाच टॉवर आहेत.
ग्राउंड प्लस 39 मजले या इमारतीत असणार आहेत. सर्व अपार्टमेंट्स 18,000 रुपये प्रति चौरस फूट दराने विकले जात आहेत. प्रत्येक फ्लॅटचा आकार 3,900 चौरस फूट असल्याचे सांगितले जात आहे.
( राज्यातील आणि जगभरातील ताज्या बातम्या मराठीत ( Marathi News ) वाचण्यासाठी Tv9 Marathi च्या वेबसाईटला फॉलो करत राहा. महत्त्वाच्या बातम्या ( Latest Marathi news ) सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या TV9 marathi Live या Youtube चॅनेलला फॉलो करा. )