रायपूर : बलवानासमोर मान झुकवा ही सावरकरांची विचारधारा आहे. भाजप हीच विचारधारा पुढे घेऊन जात आहे. तुमची इकॉनॉमी आमच्यापेक्षा मोठी आहे म्हणून आम्ही तुमच्यासोबत लढू शकत नाही, असं भाजप चीनला म्हणतेय. ही कोणती देशभक्ती आहे? हाच तुमचा राष्ट्रवाद आहे का? जो कमजोर आहे. त्याला मारा आणि जो मजबूत आहे त्याच्या समोर झुका हीच का तुमची देशभक्ती?, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
महात्मा गांधी सत्याग्रहावर बोलायचे. त्याचा अर्थ सत्याचा मार्ग कधीच सोडू नका असा आहे. संघ आणि भाजपसाठी मी नवा शब्द देत आहे. आम्ही सत्यग्राही आहोत. तर भाजपवाले सत्ताग्राही आहेत. ते सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करू शकतात. कुणापुढेही झुकू शकतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचे किस्से सांगितले. कंटेनरमधून उतरून मी चालू लागलो होतो. त्यावेळी अवघ्या 10 ते 15 दिवसात माझा अहंकरा गळून पडला. कारण मला भारत मातेनेच संदेश दिला. भारत माता म्हणाली, तुला जर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत जायचं असेल तर मनातील अहंकार आधी काढून टाक. मला भारतमातेचं म्हणणं ऐकावं लागलं. भारतमातेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. माझा आवाज गप्प झाला. मेडिटेशन केल्यावर जी अवस्था होते, तशीच माझी अवस्था झाली होती. मी मौनात गेलो होतो, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
गेल्या 52 वर्षापासून माझ्याकडे स्वत:चं घर नाहीये. आमच्या कुटुंबाचं अलहाबादमध्ये घर होतं. आता ते घरही राहिलं नाही. 120 तुघलक लेनमध्ये माझं घर नाहीये, असं त्यांनी सांगितलं. मी जेव्हा भारत जोडो यात्रेवर निघालो. तेव्हा मनात आलं माझी जबाबदारी काय आहे? मी मनाशीच म्हणालो, माझ्या बाजूला आणि पाठी जी खाली जागा आहे. तिथे मला आपल्या देशातील लोक भेटायला येतील. पुढील चार महिन्यासाठी आमचं ते घर आमच्यासोबत असेल. या घरात जो कोणी येईल, मग गरीब असो वा श्रीमंत, बुजुर्ग असो वा युवा वा लहान मुल. कोणत्याही धर्माची व्यक्ती असो. कोणत्याही राज्याची व्यक्ती असो. माणूस असो वा प्राणी. आपल्याच घरात आलोय असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, असं ते म्हणाले.
मला शेतीचं फार कळत नाही. थोडंफारच समजतं. पूर्वी मी शेतकऱ्यांना भेटायचो तेव्हा आपलं ज्ञान त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचो. शेतीपासून ते फर्टिलाझरपर्यंत ते रोहयोबाबत मी त्यांना सांगण्याचं काम करायचो. या यात्रेनंतर ते हळूहळू बंद झालं आहे. एक अनामिक शांतता आली आहे. मी आता निरव शांतता ऐकत आहे, असं ते म्हणाले.
देशातील राजकारण पाहून काही तरी चुकीचं होतंय असं ज्या लोकांना वाटतं त्यांना व्यासपीठ देणं हे आमचं काम आहे. त्यांचा आवाज बुलंद करणं हे आमचं काम आहे. ज्या लोकांना या गोष्टी समजत नाहीये. त्यांना समजावण्याचं आमचं काम आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.