नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळेच काँग्रेसने आज देशभर आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात तर राजघाटावर आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरील बायोमध्ये बदल केला आहे. त्यात त्यांनी खासदार ऐवजी डिस्क्वॉलिफाईड एमपी असं लिहिलं आहे. म्हणजे निलंबित खासदार असा त्यांनी स्वत:चा उल्लेख केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. त्यानंतर त्यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील बायोमध्ये बदल केला आहे. पूर्वी त्यांच्या बायोमध्ये सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि खासदार असं लिहिलेलं होतं. आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता राहुल यांच्या बायोमध्ये सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस. Dis’Qualified MP… असं नमूद केलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या बायोमध्ये निलंबित खासदार असं लिहून एक प्रकारे भाजपचा निषेध नोंदवला असून देशात हुकूमशाही कशा प्रकारे सुरू आहे, हे दाखवण्याचाच त्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ प्रियंका गांधी मैदानात उतरल्या आहेत. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाटावर संकल्प सत्याग्रहाचे आयोजन केलं आहे. पोलिसांची परवानगी नसताना ही परवानगी झुगारून हे आंदोलन सुरू आहे. राजघाट परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या परिसरात कुणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, तरीही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर देशभरातही काँग्रेस नेत्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. काही ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे. तर काही ठिकाणी मूक आंदोलन सुरू आहे.
काँग्रेसच्या एक दिवसीय संकल्प आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी मोदींबाबत बोलले तर त्यांना शिक्षा झाली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर वारंवार टीका केली. गांधी आणि नेहरू घराण्याचा वारंवार अपमान केला. त्यावर कारवाई का होत नाही? मोदींवरही मानहानीचा खटला का दाखल केला जाऊ नये? असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.