सर्वात मोठी बातमी ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 24, 2023 | 2:46 PM

काल कोर्टाने त्यावर निर्णय दिला. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर होते. कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.

सर्वात मोठी बातमी ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. सचिवालयाने तसे नोटिफिकेशन्स काढले आहे. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

YouTube video player

राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे प्रचंड जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

पूर्णेश मोदींचा आक्षेप

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपचे गुजरातमधील आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेतला होता. या विधानाप्रकरणी त्यांनी सुरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी मोदी समुदायाचा अपमान केला आहे. त्यांच्या या विधानामुळे मोदी समुदायाला मान खाली घालावी लागली आहे, असा युक्तिवाद पूर्णेश मोदी यांनी आपल्या याचिकेत केला होता. या प्रकरणी राहुल गांधी तीनदा सुरत कोर्टात उपस्थित राहिले होते. आपण निर्दोष असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं. मी राजकारणी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात मी बोलत असतो. त्याप्रमाणे मी ते विधान केलं. ते राजकीय विधान होतं. कोणत्याही समुदायाची भावना दुखावण्याचा त्यामागचा हेतू नव्हता, असं राहुल गांधी यांनी कोर्टात सांगितलं होतं. मात्र, कोर्टाने त्यांचं म्हणणं अमान्य केलं.

लोकशाहीसाठी अशुभ संकेत

या प्रकरणावर गेल्या शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. काल कोर्टाने त्यावर निर्णय दिला. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर होते. कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. त्यानंतर आज त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं हे लोकशाहीसाठीचे अशुभ संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दिली आहे.