नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून ही कारवाई झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत राहुल गांधी यांनी मोजकीच प्रतिक्रिया दिली. मात्र आज शनिवारी त्यांनी या मुद्द्यावरून सविस्तर पत्रकार परिषद घेतली. मी मोदी आडनावावरून टीका केली, त्यामुळे OBC चा अपमान झाला, असं म्हटलं जातंय, त्यासाठी सूरत कोर्टाने शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं. हा सगळा खेळ केवळ ओबीसींच्या अवमानाविरोधात आहे, असं वाटत असेल. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न लपवण्यासाठी हे षडयंत्र रचलं जातंय, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. तो प्रश्न म्हणजे अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपये कुठून गुंतवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी इतर खेळ खेळले जात आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. खासदारकी रद्द करून किंवा तुरुंगात डांबण्याच्या धमक्या देऊन माझा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिलाय.
राहुल गांधी यांच्यावरील कारवाई नेमकी का झाली, याचं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं. ते म्हणाले, ‘ मी काही आठवड्यांपूर्वी मोदी आणि अदानी यांच्या संबंधांवरून प्रश्न उपस्थित केले. माझ्या अदानी यांना नियमात बदल करून विमानतळं देण्यात आली, असं मी म्हणालो होतो. मी लोकसभा अध्यक्षांनाही यावरून पत्र लिहिलं होतं. खासदारांनी माझ्याविरोधात लोकसभेत खोटे दावे केले. मी विदेशी ताकतींकडून मदत मागितली, असं म्हटलं. पण मी तसं काहीही म्हणालो नव्हतो. लोकसभेत एखाद्या सदस्यावर आरोप होत असतील तर त्याला स्पष्टीकरण देण्याचा हक्क असतो. त्यासाठी मी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राला उत्तर नाही मिळालं. दुसऱ्या पत्रालाही उत्तर नाही मिळालं. मी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये गेलो. त्यांना विचारलं, मला माझं मत का मांडू दिलं जात नाहीये? यावर अध्यक्ष हसले, म्हणाले, मी काही करू शकत नाही. त्यानंतर काय झालं, हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं..
माझ्यावर कारवाई झाली तरीही मी थांबणार नाही. धमक्यांना मी घाबरत नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, ‘ कितीही कारवाई करा. मी प्रश्न विचारणं थांबवणार नाही. मोदी-अदानींचा संबंध काय… २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? मी लोकशाहीसाठी लढतोय. लढत राहीन. कुणालाही घाबरत नाही. हे सत्य आहे.