नवी दिल्ली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संसेदत 2 तास 13 मिनिट बोलले. शेवटी फक्त 2 मिनिट ते मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. निरपराध लोकांची हत्या केली जात आहे. बलात्कार होत आहेत. पण पंतप्रधान हसत आहेत, त्यांचे जोक सुरु आहेत. हे त्यांना शोभत नाही” अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रणीत इंडियाचा समाचार घेतला.
“मणिपूरमध्ये सुरु असलेला मूर्खपणा भारतीय सैन्य दोन दिवसात थांबवेल. पण मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यांना आग विझवायची नाहीय” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘म्हणून मी म्हणालो, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आलीय’
“मी मणिपूरमध्ये मैती भागात गेलो. त्यावेळी मला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, माझ्या सुरक्षेमध्ये कोणी कुकी असेल, तर त्याला इथे आणू नका. आम्ही त्याची हत्या करु. आम्ही कुकींच्या भागात गेलो, त्यावेळी त्यांनी सुद्धा हेच सांगितलं. कुठला मैती इथे आणला, तर आम्ही त्याला गोळी घालू. त्यामुळे मणिपूर एक राज्य नाहीय. त्याची दोन भागात विभागणी झालीय. राज्याची हत्या करण्यात आलीय. म्हणून मी म्हणालो, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आलीय” असं काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले.
त्यांचा तो हेतूच दिसत नाही
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमीत कमी मणिपूरमध्ये जावं. त्या समुदायाशी बोलावं. मी तुमचा पंतप्रधान आहे, हे त्यांना सांगावं. पण मला त्यांचा तो हेतूच दिसत नाही. पंतप्रधान मोदी 2024 मध्ये पंतप्रधानपदी कायम राहतील का? हा प्रश्न नाहीय. प्रश्न मणिपूरचा आहे. लहान मुलं, नागरिकांची हत्या सुरु आहे” असं राहुल गांधी म्हणाले.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi says, “…I know media is under control, Rajya Sabha, Lok Sabha TV is under control but I am doing my work and will continue to do it. Wherever ‘Bharat Mata’ will be attacked, you will find me present there and protecting the Bharat Mata.” pic.twitter.com/amK1D7ztPt
— ANI (@ANI) August 11, 2023
तर ते राजकारणी वाटतील
“पंतप्रधान पंतप्रधानांसारखे वागले, तर ते राजकारणी वाटतील. ते देशाच आवाज वाटले पाहिजेत. राजकारण बाजूला ठेवावं. पंतप्रधानांनी राजकारण्यासारख बोलू नये. त्यांच्यामागे भारतीय जनता अशा पद्धतीने बोलावं” असं राहुल गांधी म्हणाले.
‘मीडिया नियंत्रणाखाली आहे’
“मीडिया नियंत्रणाखाली आहे, हे मला माहित आहे. राज्यसभा, लोकसभा टीव्ही नियंत्रणाखाली आहे. पण मी माझं काम करतोय आणि करत राहीन. जेव्हा कधी भारत मातेवर हल्ला होईल, तेव्हा तुम्ही मला तिथे भारत मातेच रक्षण करताना पाहाल” असं राहुल गांधी यांनी सांगितलं.