राहुल गांधी यांची तरुण फळी मोडली, ‘चौकडी’ संपली! तिघे भाजपात एक शिवसेनेत, कोण आहेत ते तरुण नेते?

| Updated on: Jan 14, 2024 | 10:50 PM

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राहुल गांधी यांच्या जवळचे नेते हळूहळू पक्षाचा निरोप घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राहुल गांधी यांची तरुण फळी मोडली, चौकडी संपली! तिघे भाजपात एक शिवसेनेत, कोण आहेत ते तरुण नेते?
RAHUL GANDHI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 14 जानेवारी 2024 : 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यानंतर कॉंग्रेससह अन्य पक्षांचे एक एक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. पक्षापासून दूर जाणारे किंवा पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची ही यादी खूप मोठी आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा सुरु करत आहेत. तर, त्यांचे नेते पक्ष तोडो कार्यक्रम करत आहेत. राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांनीच पक्षाला रामराम केल्यामुळे त्याची ‘चौकडी’ विखुरली गेली आहे. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या चार नेत्यांनी पक्ष सोडला. हा कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सद्य परिस्थितीत कॉंग्रेस समोर मोठे आव्हान आहे ते म्हणजे तरुण नेत्यांना इतर पक्षात जाण्यापासून रोखण्याचे. एका धक्क्यातून सावरेपर्यंत पक्षाला दुसरा मोठा धक्का बसत आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आहे. तो अनेकदा जनतेसमोर जाहीरपणे उघड झाला आहे. मात्र, त्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यात कॉंग्रेसला अपयश आले आहे.

राहुल गांधी यांना सोडून गेलेल्या चार तरुण प्रमुख नेत्यांपैकी तीन नेत्यांनी भाजपमध्ये तर मिलिंद देवरा यांच्या रूपाने एका नेत्याने शिवसेनेते प्रवेश केला. शिंदे गटाच्या शिवसेनेशी भाजप सोबत युती आहे हे विशेष आहे. या चारही नेत्यांचे त्या त्या राज्यात बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यात आता महाराष्ट्राचे दिग्गज नेते मिलिंद देवरा यांच्या नावाची भर पडली आहे.

मिलिंद देवरा हे 2004 आणि 2009 मध्ये मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर ते टिकू शकले नाहीत. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती. मात्र, शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटासोबत कायम राहिले.

मध्य प्रदेशमध्ये पहिला धक्का

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मार्च २०२० मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या 22 आमदारांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे कॉंग्रेस सरकार पडले आणि भाजप पुन्हा सत्तेत आला. काँग्रेसपासून वेगळे झालेले सिंधिया भाजपमध्ये दाखल झाले. सध्या ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत.

यूपीमध्ये जितिन प्रसाद यांनी दिला दुसरा धक्का

जून 2021 मध्ये जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. त्यावेळी त्यांनी मी कोणत्या व्यक्ती किंवा कोणत्याही पदासाठी राजीनामा देत नाही. तर, काँग्रेसचा कमी होत असलेला जनाधार यामुळे काँग्रेस सोडत आहे. जतीन प्रसाद यांचेही कॉंग्रेससोबत तीन पिढ्यांचे संबंध होते. यूपीए सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले होते. सध्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत.

आरपीएन सिंह यांनीही साथ सोडली

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील आणखी एक बडे नेते आरपीएन सिंग यांनीही २०२२ मध्ये काँग्रेसची साथ सोडली. निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या पक्षाने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडणे हा कॉंग्रेसला मोठा धक्का होता. ज्या पक्षापासून सुरुवात केली तो पक्ष आता टिकत नाही. तसा विचारही टिकत नाही, असा आरोप त्यांनी केला होता.