अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात कोणत्या वर्गाला काय दिले? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प नसल्यामुळे यामध्ये केवळ एक, दोन वेळा रेल्वे शब्दाचा उच्चार निर्मला सीतारामन यांनी केला. परंतु अर्थसंकल्प संपल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना चांगली बातमी दिली. मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना रेल्वेमंत्र्यांनी आनंदाची बातमी दिली. त्यामुळे त्यांचा रेल्वे प्रवास सुखद होणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे सध्या अडीच हजार नॉन-एसी डबे तयार करत असून पुढील तीन वर्षांत आणखी दहा हजार अतिरिक्त नॉन-एसी डबे तयार केले जातील. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत सुरक्षितपणे प्रवास करता यावा हे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. या गाड्यांमधून एक हजार किलोमीटरच्या प्रवासासाठी केवळ 450 रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या सुविधा देत आहेत.
‘एनडीटीव्ही’शी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2014 पूर्वी रेल्वेसाठी भांडवली खर्चावरील गुंतवणूक सुमारे 35,000 कोटी रुपये होती. आता ती 2.62 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. रेल्वेसाठी हा विक्रमी भांडवली खर्च आहे. रेल्वेत या गुंतवणुकीबद्दल मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचा खूप आभारी आहे. 2014 पूर्वीची 60 वर्षे पाहिल्यास रेल्वेच्या ट्रॅकची क्षमता आहे की नाही ते न पाहता नवीन रेल्वे गाड्यांची घोषणा केली जात होती. परंतु गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या पायाभूत विकासावर भर दिला.
गेल्या काही वर्षांत रेल्वेने वंदे भारत गाड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, आमच्याकडे एक मोठा अल्प उत्पन्न गट आहे आणि आम्ही आहोत. दुसरा असा वर्ग आहे की त्यांना सुविधा हव्या आहेत. त्यामुळे आम्ही या दोन्ही वर्गांमध्ये संतुलन निर्माण करत आहोत. एसी आणि नॉन एसी कोचचे प्रमाण 1/3 आहे. अनेक लोक नॉन एसी डब्यातून प्रवास करत आहेत. त्यामुळे आम्ही एक विशेष अभियान सुरु केले आहे. आम्ही 2,500 नॉन AC कोच बनवत आहोत. पुढील तीन वर्षांमध्ये आणखी 10,000 अतिरिक्त नॉन एसी कोच बनवणार आहे.