जयपूर : कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पक्षाकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना पक्षाला जून महिन्यातच मोठा हादरा बसणार आहे. राजस्थानमधील पक्षाचा बडा नेता पक्षाला रामराम ठोकणार आहे. जून महिन्यात या नेत्याकडून स्वत:च्या पक्षाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हा नेता पक्ष सोडणार आहे.
कोण करणार नवीन पक्ष
काँग्रेसमधील नेते सचिन पायलट स्वत:चा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. पालयट यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या IPAC ची सेवा देखील घेतली आहे. IPAC ही प्रशांत किशोर यांची संघटना आहे, ज्याने अनेक पक्षांना पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार इत्यादी निवडणुका जिंकण्यास मदत केली आहे. आता यानंतर पायलट दोन ते तीन आठवड्यांत स्वतःचा राजकीय पक्ष सुरू करणार आहे.
IPAC चे 100 जण पायलटसाठी कामाला
आयपीएसीशी संबंधित इतर दोन लोकांनीही पुष्टी केली आहे की ही संस्था सचिन पायलटला त्यांचा नवीन पक्ष तयार करण्यासाठी मदत करत आहे. या दोन लोकांमध्ये एक माजी कर्मचारी असून एक सध्याचा आहे. “IPAC चे 100 लोक सध्या सचिनसोबत काम करत आहेत. आम्हाला आणखी 1,100 लोकांना कामावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. सचिन पायलट जूनमध्येच त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा करू शकतात, असा दावाही करण्यात आला आहे.
गहलोत, पायलट वाद
राजस्थानात सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. या वादावर अंतिम तोडगा अजूनही निघाला नाही. पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थानंतर दोन्ही गटात तोडगा निघतो, काही काळ जातो अन् पुन्हा वाद सुरु होतो.
दिल्लीत राज्यप्रभारींची बैठक
राज्यातील बदलत्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी सुखविंदर सिंह रंधावा यांनी दिल्लीत प्रदेश अध्यक्ष आणि सह प्रभारी यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गोंविद सिंह डोटासरा देखील सामील झाले होते. परंतु या बैठकीत दोन्ही नेत्यांमधील वादावर काय झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.