जयपूर | 2 ऑक्टोबर 2023 : लग्न झाल्यानंतर मुलं आईवडिलांची सेवा करत नसल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. ऐकली आहेत. काही मुलं तर परदेशात जातात ते परत येतच नाहीत. इकडे म्हातारे आईवडील मुलांची वाट पाहून पाहून थकून जातात. पण मुलांचा काही पत्ता नसतो. काही वेळा तर आई वडिलांचा मृत्यू होतो, पण त्यांच्या अंत्यविधीलाही मुलं येत नाहीत. केवळ पैशाच्या मागे ही मुलं धावत असतात. पण काही मुलं याला अपवाद आहेत. एका मुलाने तर फक्त आणि फक्त आईवडिलांची सेवा करण्यासाठी लाखो रुपयांची नोकरी सोडली. ब्रिटनहून थेट आपल्या गावात आलाय. आता तो आईवडिलांसोबत असतो. त्यांची सेवा करतो आणि शेतीही करतो.
मनिष शर्मा असं या तरुणाचं नाव आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. आधी तो ब्रिटनमध्ये ॲपल कंपनीत काम करत होता. त्याला वर्षाला 72 लाखाचं पॅकेज होतं. पण आईवडिलांची सेवा करण्यासाठी मनिषने ॲपल कंपनीतील नोकरी सोडली. नोकरीसोबतच त्याने ब्रिटनही सोडलंय. तो आपल्या गावात आलाय. गावात शेती करतोय. आता शेती करून त्याला दीड वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यातून त्याला चांगलं उत्पन्नही होत आहे.
मनिष शर्मा याने नागौरच्या सेठ किशनलाल उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं आहे. या महाविद्यालयात त्याने 12 वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने MDHSमधून बीबीए केलं. त्याने तीन वर्षात सीएएसही केलं. त्यानंतर त्याने सीएएस सोडून कार्डिफ यूनिव्हर्सिटीतून IBM, MSC, MBA आणि PHD पूर्ण केली. त्यानंतर त्याने ब्रिटनमधील ॲपल कंपनीत नोकरी पत्करली. त्याला वर्षाला 72 लाखाचं पॅकेजही देण्यात आलं. याच दरम्यान 2020मध्ये कोरोनाचं संकट उभं राहिलं. लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. लोक नोकऱ्यांसाठी इकडे तिकडे भटकत होते. परंतु, मनिषने आईवडिलाांची सेवा करण्यासाठी ॲपलमधील नोकरी सोडली. तो पुन्हा नागौरला आला. तिथे त्याने जैविक शेती सुरू केली.
मनिष आपल्या शेतात अनोखे प्रयोग करत आहे. विविध पिके घेत आहे. बाजरी, कापूस, जिरे, गहू आदी पिके तो घेत आहे. रब्बीची सर्व पिकेही तो घेतोय. त्याप्रमाणे तो 40 प्रकारच्या भाज्याही आपल्या शेतात पिकवत आहे. गेल्या दीड वर्षात त्याने जैविक पद्धतीने शेती करून 15 लाख रुपये कमावले आहेत.
मला आईवडिलांसोबत राहायचं होतं. पण ब्रिटन सरकार आईवडिलांसोबत राहू देत नाही. त्यामुळे नोकरी सोडण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सोडू शकत नाही. त्यांची सेवा कोण करेल? ते एकटेच असतात. त्यामुळे मी नोकरी सोडली आणि गावाकडे येऊन शेती करतोय, असं मनिष म्हणाला.