संदीप राजगोळकर, नवी दिल्ली 14 डिसेंबर | बुधवारी संसदेत झालेल्या हल्ला प्रकरणात एकीकडे आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे या हल्ल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेत उमटले. यानंतर गुरुवारी संसदेत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली. गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आम्ही सर्व खासदारांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्यांना आम्ही पास देतो त्याबाबत काळजी घ्यायला हवी. संसदेच्या सभागृहात विरोधकांनी अराजकता निर्माण करणे योग्य नाही. काल जो प्रकार झाला तो दुर्देवी आहे. या प्रकरणी लोकसभा सचिवालयातील आठ जणांना निलंबित करण्यात आले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, बुधवारच्या घटनेनंतर आम्ही सर्वच जण चिंतेत आहोत. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्या सचिवालयाची आहे. लोकसभा सचिवालय पुन्हा सर्व खासदारांशी चर्चा करणार आहे.
सुरक्षेत आढळलेल्या त्रुटीनंतर संसदेतील प्रवेशांवर निर्बंध लादण्यात आले. यापुढे सगळ्या प्रवेशद्वारांवर बॉडी स्कॅनर बसवले जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत. तसेच संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले जाणार आहे. आता खासदारांच्या पीएना ही संसदेत प्रवेश दिला जाणार नाही.
संसदेच्या कामकाजापूर्वी सत्ताधारी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. एकीकडे इंडिया आघाडीची बैठक होत असतानाच सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांची बैठक झाली. बैठकीत संसदेमधील बुधवारी झालेल्या प्रकरणावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच या प्रकरणात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यानंतर इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. या प्रकरणान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात येणार आहे.