भारत पाकिस्तानसोबत चर्चेला तयार, फक्त पाकच्या पंतप्रधानांनी करावी ही गोष्ट – राजनाथ सिंह

| Updated on: Sep 09, 2024 | 10:23 PM

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रामबन जिल्ह्यात भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जर पाकिस्तानने ही गोष्ट केली तर भारत त्याच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. त्याचबरोबर पीओकेमधील लोकांनी भारतात सामील व्हावे, कारण पाकिस्तान त्यांना परदेशी समजतो, असेही ते म्हणाले.

भारत पाकिस्तानसोबत चर्चेला तयार, फक्त पाकच्या पंतप्रधानांनी करावी ही गोष्ट - राजनाथ सिंह
Follow us on

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुक जवळ आली आहे. राज्यात राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. या दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. काही लोक पाकिस्तानसोबत चर्चा करावी असे बोलतात. जर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद थांबवला तर भारत त्याच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. असं त्यांनी म्हटलंय. बनिहाल विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवाद आणि त्याला देत असलेला पाठिंबा बंद केला पाहिजे. शेजारी देशांशी संबंध चांगले असावे अशी इच्छा कुणाची नसेल ? कारण मला वास्तव माहीत आहे की तुम्ही तुमचा मित्र बदलू शकता, पण शेजारी नाही.

केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणाले की, आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत, पण आधी त्यांनी दहशतवाद थांबवला पाहिजे. जेव्हा पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला पुरस्कृत करणे थांबवेल तेव्हा भारत त्याच्याशी चर्चा सुरू करेल, असे संरक्षण मंत्री म्हणाले आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्यांपैकी ८५ टक्के मुस्लीम आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादी घटना सामान्य होत्या. दहशतवादी घटनांमध्ये हिंदू मारले जात होते का? मी गृहमंत्री झालो आहे आणि मला माहीत आहे की, दहशतवादी घटनांमध्ये मुस्लिमांनी सर्वाधिक जीव गमावला.

‘पीओकेच्या रहिवाशांनी भारताचा भाग व्हावे’

रविवारी एका रॅलीत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) रहिवाशांनी भारतात येऊन भारताचा भाग व्हावे. आम्ही तुम्हाला आमचे स्वतःचे समजतो तर पाकिस्तान तुम्हाला परदेशी समजतो. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे.

राजनाथ सिंह यांनी म्हटले की, ऑगस्ट 2019 पासून जम्मू आणि काश्मीरमधील एकूण सुरक्षेच्या परिस्थितीत दिसून आलेला “मोठा बदल” म्हणजे तरुण आता पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरऐवजी त्यांच्या हातात लॅपटॉप आणि संगणक घेत आहेत. श्रीनगरमध्ये लोकांवर गोळीबार करण्याचे धाडस कोणी करत नाही.

संरक्षण मंत्री म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरमध्ये पुढील सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा द्या, जेणेकरून आम्ही या प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर विकास करू शकू. पीओकेचे लोक हे पाहतील आणि म्हणतील की आम्हाला भारतात जायचे आहे. अलीकडेच शेजारील देशातील पाकिस्तानच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलने पीओके ही परदेशी भूमी असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.