अनेक वेळा निवडणुकीत आगळ्यावेगळ्या घटना घडत असतात. परंतु त्यात सहज विश्वास ठेवला जात नाही. काही वर्षांपूर्वी पक्षाकडून उमेदवारी मिळवणे अवघड नव्हते. पक्षच समाजातील जबाबदार व्यक्तींना शोधून त्यांच्यापर्यंत पोहचत होता. मग संघ लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेला व्यक्ती नवी दिल्लीत मुलाखतीसाठी पोहचले. परंतु मुलाखत न देता काँग्रेसचे तिकीट घेऊन मतदार संघात परतले. हा किस्सा आहे काँग्रेसचे नेते राम भगत पासवान यांचा. त्यावेळी नेमके काय घडले, पाहू या…
राम भगत पासवान १९७० मध्ये युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. आयोगाकडून त्यांना मुलाखतीसाठी दिल्लीत बोलवण्यात आले. ते बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातून नवी दिल्लीत पोहचले. नवी दिल्लीत त्यांची भेट काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री ललित नारायण मिश्रा, विनोदानंद झा आणि नागेंद्र झा यांच्यासोबत झाली. त्यांनी राम भगत यांना मुलाखतीला जाऊ दिले नाही. त्यांनी त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक उतरण्याचे सांगितले. राम भगत पासवान यांनी एक मिनिट विचार न करता प्रस्ताव मान्य केला.
बिहारमधील रोसडा लोकसभा मतदार संघातून १९७१ मध्ये राम भगत पासवान निवडणुकीच्या रणात उतरले. त्यांच्याकडे न पैसा होता, ना जनमत. त्यांच्याकडे फक्त काँग्रेसचे नाव होते. ते सायकलने प्रचार करत होते. परंतु मतदानानंतर जेव्हा मतमोजणी झाली, तेव्हा सर्वांना धक्का बसला. त्यांनी प्रतिस्पर्धी संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार रामसेवक हजारी यांचा पराभव केला. ते दोन वेळा या मतदार संघातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. तब्बल १७ वर्ष ते खासदार होते.
राम भगत पासवान यांच्या परिवारातील कोणीही राजकारणात नव्हते. ते सीएम कॉलेजमधील भागात पोस्टमास्टर होते. त्यावेळी त्यांचा पगार १५० रुपये होता. पोस्टमास्टर असताना त्यांनी युपीएससीची प्रिलियम अन् मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती.