नवी दिल्ली : 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या दोन दिवसात 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी जोरदार तयारी सुरु आहे. २४ तास मंदिराचे काम चालू आहे.
उत्तर प्रदेशात आधीच या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन सरकारने केले आहे. जे लोकं बाहेरून अयोध्येत येणार आहे. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ते पाऊलं उचलण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत.
अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी देशभरातील न्यायालयांमध्ये वकिलांनी सुट्टीची मागणी केली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय, देशातील सर्व उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालयांमध्ये सुट्टी जाहीर करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा म्हणाले की, 22 जानेवारीच्या सुट्टीमुळे वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अयोध्या आणि देशभरातील इतर संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची किंवा भेट देण्याची संधी मिळेल. त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की तातडीची सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणाची विशेष व्यवस्था करून किंवा पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पुनर्निर्धारित केली जाऊ शकते.
राजस्थानमध्ये २२ जानेवारीला दारूची दुकाने बंद राहणार आहेत. छत्तीसगडमध्ये ही सरकारनेह रेस्टॉरंट, पब आणि क्लब बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दारूची दुकाने बंद राहतील. हरियाणामध्येही मनोहर लाल सरकारने राज्यात २२ जानेवारी हा ‘ड्राय डे’ म्हणून घोषित केला आहे.