इंदौर, मध्य प्रदेश : देशभरात रामनवमीचा (Ramnavami) उत्साह आहे. अनेक ठिकाणी प्राचीन राम मंदिरांमध्ये श्रीराम जन्माचा उत्सव पार पडला. मध्य प्रदेशातील एका जुन्या मंदिरात याच प्रकारे जन्मोत्सव सुरु असताना भीषण घटना घडली. इंदौर (Indore) येथील एका जुन्या मंदिरात भाविक राम जन्मासाठी जमले होते. रामाच्या मूर्तीसमोर पूजा, आरतीसाठी लोक उभे होते. मात्र ते ज्या ठिकाणी उभे होते, तिथे एक प्राचीन विहिर होती. त्यावर सिमेंटचं अच्छादन होतं. २०-२५ जण त्यावर उभे असतानाच अचानक हे झाकण धसलं अन् हे लोक थेट विहिरीत कोसळले.
#Mahadev Jhulelal Temple,25 people fall in well at Indore temple, rescue work on #Indore #RamNavami #श्रीराम #श्रीरामनवमी #Police #shivrajsinghchouhan @Manchh_Official pic.twitter.com/zpXomg1UcB
— PUNIT TIWARI (@punittiwari27) March 30, 2023
इंदौर येथील स्नेहनगर जवळील पटेल नगर परिसरातील राम मंदिरात ही भीषण घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात विहिरीवर टाकलेलं अच्छादन अचानक ढासळलं. ही विहीर ५० फूट खोल होती. राम नवमीच्या उत्सवासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. या विहिरीवर २० ते २५ जण उभे होते. अचानक हे झाकण ढासळल्याने सगळेच लोक थेट पाण्यात कोसळले. या भाविकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु आहे.
राम जन्मोत्सवानिमित्त भाविक जमले असताना अशी घटना घडल्याने इंदौरमध्ये खळबळ माजली आहे. इंदौरचे खासदार लालवानी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. या विहिरीत पाणी असल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरतंय. मंदिर परिसरात आता लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. १० वर्षांपूर्वीच विहिरीवर हे झाकण तयार करण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. या घटनेत किती जण विहिरीत पडले, याचा निश्चित आकडा समोर आला नाही. मात्र आतापर्यंत ५-६ जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु असून बचावलेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल केलं जातंय.