राहुल गांधी म्हणाले, भाजपने विरोधकांच्या हाती मुद्दा दिला; भाजप म्हणते, नखे कापून शहीद होऊ नका!

| Updated on: Mar 25, 2023 | 3:01 PM

आम्ही जिंकलो तर लोकशाही व्यवस्थित आहे. आम्ही हरलो तर लोकशाही धोक्यात आहे. आम्ही जिंकलो तर निवडणूक आयोग चांगला. हरलो तर वाईट, असं राहुल गांधी यांच्या राजकारणाचं एक तंत्र आहे, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केलीय.

राहुल गांधी म्हणाले, भाजपने विरोधकांच्या हाती मुद्दा दिला; भाजप म्हणते, नखे कापून शहीद होऊ नका!
ravi shankar prasad
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. माझी खासदारकी रद्द केली, तुरुंगात टाकलं तरी माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. मी बोलतच राहणार. प्रश्न विचारतच राहणार, असं राहुल गांधी म्हणाले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी खासदारकी रद्द करून विरोधकांच्या हाती मुद्दा दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानाची भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी यांच्यावर मानाहानीचे 60 खटले सुरू आहेत. राहुल गांधी जाणूनबुजून जर बोलत असतील हा ओबीसींचाच अपमान आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे भाजप त्याविरोधात संपूर्ण देशात आंदोलन करेल. राहुल गांधी यांच्याकडे मोठमोठे वकील आहेत. राज्यसभेत आणि लोकसभेत त्यांच्याकडे वकिलांची फौज आहे. ही फौज सुरत न्यायालयात का आणली नाही? असा सवाल करतानाच राहुल गांधी कांगावा करत आहेत. नखे कापून शहीद होण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.

पवन खेडा प्रकरणात मोठमोठ्या वकिलांची फौज कोर्टात पोहोचली होती. राहुल गांधी यांच्या प्रकरणात ही फौज कुठे गेली होती. राहुल गांधी यांनी मुद्दाम कोर्टात वकील नेले नाहीत. हा त्यांच्या रणनीतीचा एक भाग होता, असं रविशंकर प्रसाद म्हणाले. मोदींची सर्वाधिक लोकसंख्या मागास समाजातून येते. टीका करण्याचा अधिकार आणि शिव्याशाप देण्याचा अधिकार राहुल गांधी यांना नाही. राहुल गांधी यांनी एका समुदायला शिव्या दिल्या आहेत. त्यांचा अपमान केला आहे. राहुल यांना चुकीचं बोलण्याचा अधिकार आहे तर ओबीसींनाही कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. कोर्टाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली. पण त्यंनी माफी मागण्यास नकार दिला, याकडेही रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा

कायदाच आहे तसा

तुम्हाला जर दोन वर्षाची शिक्षा झाली तर तुम्ही लगेच निलंबित होता, तसा कायदाच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ते स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांच्या प्रकरणात काँग्रेसने स्टे घेण्याचा प्रयत्न केला नाही. हा प्रकार म्हणजे नखं कापून शहीद होण्याचा आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एक रणनीतीचा भाग आहे. राहुल गांधी यांच्यावर अन्याय झाल्याचं दाखवायचं आणि कर्नाटक निवडणुकीत विजयी व्हायचा हा त्यामागचा हेतू आहे. राहुल यांना पीडित दाखवून काँग्रेस वाचवण्याची धडपड सुरू आहे. याचे उत्तर तुम्हाला द्यावच लागेल. दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडील वकिलांच्या फौजेने त्यांना सोडण्याचा प्रयत्न का केला नाही? देशात जर सर्वांसाठी एकच कायदा आहे तर तुमच्यासाठी वेगळा कायदा आहे काय? असा सवाल त्यांनी केला.

राहुल आज पुन्हा खोटे बोलले

राहुल गांधी आज पुन्हा एकदा खोटे बोलले. मी लंडनमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही असं राहुल म्हणाले. खरंतर राहुल गांधी यांच्या राजकारणाचं एक तंत्र आहे. आम्ही जिंकलो तर लोकशाही व्यवस्थित आहे. आम्ही हरलो तर लोकशाही धोक्यात आहे. आम्ही जिंकलो तर निवडणूक आयोग चांगला. हरलो तर वाईट. आमच्या बाजूने निकाल आला तर न्यायालय चांगलं आणि आमच्याविरोधात निकाल गेला तर न्यायालयाचा निर्णय चुकीचा, असं ते ठसवत असतात.