हैदराबाद : हैदराबादमध्ये (Hyderabad) भाजपाच्या दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या भाजप (BJP) नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी संबंधित केले. समाजातील वंचित घटक तसेच ओबीसी आणि मुस्लीम समाजापर्यंत जास्तीतजास्त कसे पोहोचता येईल, त्यांच्याशी संपर्क कसा वाढवता येईल ते पहावे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला. या बैठकीला भाजपाचे जवळपास सर्वच राष्ट्रीय नेते उपस्थित होते. तसेच देशात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत आपण समाजासाठी, पक्षासाठी काय कार्य केले याचा आढावा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावा असे आवाहन देखील या बैठकीत मोदींनी केले आहे. नुपूर शर्म यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळला, तसेच या प्रकरणात राजस्थानमध्ये एका तरुणाला प्राण गमवावे लागेल. या सर्व प्रकरणानंतर ही भाजपाची पहिलीच कार्यकारिणीची बैठक होती. मात्र या बैठकीत मोदींनी या विषयावर बोलणे टाळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना घराणेशाहीवर देखील जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आता राजकारणातील घराणेशाही संपुष्टात येत आहे. समाजच ही घराणेशाही मोडीत काढत असल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अनेक विरोधी पक्ष आज रसातळाला पोहोचले आहेत. मात्र त्यांची थट्टा न करता त्यांना अपयश का आले यातून भाजप कार्यकर्त्यांनी धडा घ्यावा असे मोदींनी म्हटले आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी सेवा, संतुलन आणि समन्वय या तीन गोष्टींवर भर द्यावा असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीमध्ये केले आहे. या दोन दिवशीय बैठकीत अनेक महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली आहे.
भाजपाच्या एकूणच हालचालींवरून भाजपाला आत दक्षिण भारतात देखील आपला विस्तार वाढवायचा असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आले होते. तसेच भाजपाकडून भाग्यनगरचा मुद्दा देखील वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केसीआर यांच्या गोटात मात्र चिंता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हैदराबादमध्ये आले असता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे त्यांच्या स्वागताला देखील हजर नव्हते. यावरून मुख्यमंत्र्यांनी शिष्टाचाराचे उंल्लघन केल्याची टीका के. चंद्रशेखर राव यांच्यावर करण्यात आली.