नवी दिल्ली : अल्पावधीत ऑनलाईन विश्वात नावारूपाला आलेले एडटेक स्टार्टअप ‘BYJU’s‘ आता ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आले आहे. या कंपनीचा डोलारा उभा करणारे बायजू रवींद्रन हे ईडीच्या रडारवर आले आहेत. मित्रांपासून सुरु केलेल्या शिकवणीने आज मोठा स्टार्टअप उभा केला आहे. कंपनी अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. गेल्या वर्षी BYJU’s चे बाजार मूल्य Paytm पेक्षा अधिक होते आणि ते भारतातील नंबर-1 स्टार्टअप बनले होते. एवढेच नाही तर या स्टार्टअपने 8 कंपन्या ताब्यात घेतल्या. सध्या BYJU’s मध्ये 1.5 कोटी विद्यार्थी आहेत. यापैखी 65 लाख पेड सबस्क्रायबर्स आहेत. मात्र BYJU’s चे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता.
बायजू हे कंपनीचे संस्थापक-सीईओ आहेत. केरळच्या अझिकोडे या छोट्याशा गावात शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या पालकांकडून गणित आणि विज्ञानाचा वारसा मिळालेल्या बायजू यांनी एडटेक स्टार्टअप्सच्या विश्वात, शैक्षणिक क्षेत्रात इतिहास रचला. परदेशातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बायजू यांनी स्वतःचे नशीब अजमावले. पुढे यशस्वी घोडदौड सुरू ठेवत त्यांनी बड्या बड्या उद्योजकांना थक्क केले आहे.
केरळमधील अझिकोडे या छोट्याशा गावात बायजूचे वडील रवींद्रन भौतिकशास्त्र आणि आई शोभनवल्ली मुलांना गणित शिकवत असत. या दोघांना बायजू नावाचा मुलगा झाला. शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या पालकांकडून त्यांना गणित आणि विज्ञानाचा वारसा मिळाला. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि परदेशात नोकरी सुरू केली. सर्व काही ठीक सुरळीत सुरु होतं. पण 2003 मध्ये त्यांच्या परदेशातील करिअरला वेगळी कलाटणी मिळाली.
मित्रांना एमबीएच्या तयारीसाठी बायजू यांनी नोकरीच्या ठिकाणी 2 महिन्यांची सुट्टी घेतली होती. त्यावेळी आपणही एमबीएची परीक्षा द्यावी, असा विचार बायजू यांच्या मनात डोकावला. याचदरम्यान त्यांनी मजेत परीक्षा दिली. विशेष म्हणजे त्यांना त्या परीक्षेत 100 टक्के मिळाले होते. हा योगायोग असू शकतो, असे बायजू यांना वाटले. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली असता, त्या परीक्षेतही त्यांना 100 टक्के मिळाले. नंतर त्यांनी दोन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली.
पुढे अल्पावधीतच विद्यार्थी संख्या 8, नंतर 16 पर्यंत वाढली. तीन-चार वर्षांतच बायजू यांची लोकप्रियता इतकी वाढली की, त्यांना 2007 मध्ये एका सभागृहात वर्ग घ्यावा लागला. त्यावेळी सभागृहात 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी होते. हळूहळू लोकप्रियता वाढत गेली आणि बायजू यांनी देशातील 9 शहरांमध्ये वर्ग घेण्यास सुरुवात केली. संख्या वाढल्याने 2009 पासून व्हिडिओद्वारे वर्ग सुरू करण्यात आले.
त्यावेळी ते केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच कोचिंग देत असत. मग हळूहळू त्यांनी छोट्या वर्गांवरही लक्ष केंद्रित केले. इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही शिकवायला सुरुवात केली. Byju’s चे अॅप 2015 मध्ये लाँच करण्यात आले होते. या अॅपने स्टार्टअपला अशा दिशेने वळवले की त्याने एडटेक स्टार्टअपच्या जगात इतिहास रचला.