नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गुरुवारी जयपूरच्या दौऱ्यावर असतील. यावेळी ते दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात करतील. मॅक्रॉन 26 जानेवारी रोजी दिल्लीत कर्तव्यापथावर असलेल्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे असतील. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे सहावे फ्रेंच नेते असतील. त्याआधी जयपूरमध्ये, ताज रामबाग पॅलेसमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. ज्यामध्ये भारत-फ्रान्स संबंध आणि विविध गोष्टीवर चर्चा होईल. त्याआधी मॅक्रॉन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत रोड शोमध्ये सहभागी होतील.
जयपूरमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन पंतप्रधान मोदींसोबत रोड शोमध्ये भाग घेतील. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान गुरुवारी दुपारी 2:30 वाजता जयपूर विमानतळावर उतरणार असून ते रात्री 8:50 वाजता दिल्लीला रवाना होतील. जंतरमंतर परिसरात संध्याकाळी 6 वाजता रोड शो सुरू होणार आहे, तर पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात 7:15 वाजता चर्चा होणार आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये डिजिटल डोमेन, संरक्षण, व्यापार, ऊर्जा, भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियम सुलभ करणे यासह अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल.
26 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिन परेडचे साक्षीदार होतील. संध्याकाळी ते राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या ‘अॅट होम’ स्वागत समारंभात सहभागी होतील.
भारत सरकारने प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. बायडेन यांना येणं शक्य नसल्याने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी शेवटच्या क्षणी चर्चा झाली आणि द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व पाहून मॅक्रॉन यांनी या दौऱ्याला हिरवा झेंडा दिला.
25 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात गेल्या सहा महिन्यांत सहाव्यांदा भेट होणार आहे. फ्रान्स हा भारताचा पहिला धोरणात्मक भागीदार देश आहे.
फ्रान्स देखील भारताला अधिक महत्त्व देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅक्रॉनसोबतची उत्कृष्ट केमिस्ट्रीही अनेक प्रसंगी पाहायला मिळाली आहे. 2023 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या बॅस्टिल डे सेलिब्रेशनला प्रमुख पाहुणे होते. या वेळी पंतप्रधान मोदींना फ्रान्सकडून लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते. हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे. यासह पंतप्रधान मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते.