आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची चर्चा आपल्याकडे नेहमी होत असते. यामुळे IAS किंवा IPS होण्यासाठी तरुण-तरुणी रात्रंदिवस मेहनत करत असतात. पंजाब केडरचे आयपीएस गुरप्रीतसिंग भुल्लर देशातील सर्वात श्रीमंत आयपीएस अधिकारी आहेत. ते 2016 मध्ये चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. ती संपत्ती माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग अन् सुखबीर सिंग बादल यांच्या संपत्तीपेक्षाही जास्त होती. कोण आहेत गुरप्रीतसिंग भुल्लर, कुठे झाले त्यांचे शिक्षण, कधी झाले ते आयपीएस जाणून घेऊ या…
आयपीएस गुरप्रीत सिंह भुल्लर आयजी रँकवर आहेत. त्यांची पदोन्नोती होण्यापूर्वी ते लुधियानाचे पोलीस आयुक्त होते. त्यांचा सर्वाधिक कार्यकाळ मोहालीमध्ये गेला आहे. ते या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक होते. 2009 ते 2013 दरम्यान त्यानंतर 2015 पासून ते 2016 पर्यंत त्यांनी मोहालीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. ते 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाची (युपीएससी) तयारी त्यांनी सुरु केली. त्यात त्यांना यश मिळाले. त्यांचे अजोबा गुरदियालसिंग भुल्लर हेदेखील आयपीएस अधिकारी होते.
गुरप्रीत सिंग भुल्लर यांच्याकडे 152 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2016 मध्ये त्यांनी ही संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्याकडे आठ घरे आहेत. चार ठिकाणी त्यांची शेती आहे. तीन व्यावसायिक भूखंड असून 85 लाख रुपयांची व्यावसायिक मालमत्ता आहे. नवी दिल्लीत 1500 स्क्वेअर यार्डचा प्लॉट त्यांच्याकडे आहे. मोहालीमध्ये 45 कोटी रुपयांची जमीन त्यांच्याकडे आहे. त्यांची बहुतांश संपत्ती परंपरेने आलेली आहे. 2016 मध्ये पंजाबाचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे 48 कोटी तर सुखबीर सिंग बादल यांच्याकडे 102 कोटी रुपयांची संपत्ती होती.
कागदपत्रांनुसार, त्याची सर्वात महाग मालमत्ता अंदाजे 45 कोटी रुपये आहे. ती मोहालीमधील जमीन आहे. त्यांच्या अचल संपत्ति रिटर्न (IPR)मध्ये त्यांनी नमूद केले आहे की, त्यांना बहुतेक मालमत्ता वारशाने मिळाली आहे. आजी-आजोबांच्या वडिलोपार्जित मालमत्तांचा स्रोत म्हणून उल्लेख केला आहे.