नवी दिल्ली: ईडी, सीबीआयच्या कारवायांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जे तलवार चालवतात ते तलवारीच्याच घावाने मरत असतात. तलवारीची मूठ आमच्याही हाती येईल. तेव्हा हे शस्त्र तुमच्यावरच उलटलेलं असेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. आम्ही सगळ्यांना अंगावर घ्यायला तयार आहोत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीचे नेते आणि नातेवाईकांना त्रास देण्याचं काम करत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठी उभा आहे. नीचपणाचा कळस आणि कपट काही राजकीय पक्ष करत आहेत. पण हे कारस्थान त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे तुमच्या घरचे नोकर आहेत अशा प्रकारे काम करत आहेत. आम्ही घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्याकडे येऊन गेले. परत या आम्ही स्वागताला तयार आहोत. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. 2024 नंतर हे शस्त्र तुमच्यावर उलटेल. हे शस्त्रं तुमच्यावर उलटेल हे तुम्हाला सांगतो. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. तलवारीची मूठ आमच्याकडेही येईल. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही. कितीही कपट कारस्थान करताय ते करा. पण तपास यंत्रणांनी त्यांचे मोहरे बनू नये, असा इशारा राऊत यांनी दिला.
यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणावतवरही टीका केली. सगळया फासावर गेलेल्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्य काय भीक मागून मिळवलं का? भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी या संदर्भात मन की बात व्यक्त केली पाहिजे. गेल्या 75 वर्षात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री या सन्मानाने सन्मानित केलं आहे. तोच पुरस्कार कंगनाला दिला. हा समस्त स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. त्याकाळात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपट मिळालं आहे. मग हे ताम्रपट काय भिकाऱ्यांना दिलंय? भाजपने यावर भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे. तिला दिलेले सर्व पुरस्कार परत घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. मात्र कंगनाच्या या विधानानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला राहिलेला नाही. जर त्यांनी कंगना बेनला दिलेले पुरस्कार परत घेत नाही तोपर्यंत भाजपला अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही. त्या कंगनाबेनला तरी काय लाजलज्जा. तिने माफी तरी मागावी, ज्या वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावरून हा सोहळा झाला. तिथे लोकांनी टाळ्या वाजवल्या. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्यावरही टीका केली. सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुष वेशातील कंगनाबेन आहेत. काँग्रेसचे जुनेजाणते नेते राहुल गांधी आणि काँग्रेसला सतत अडचणीत आणत असतात. ते विद्वान आहेत. पुस्तक लिहितात. एखादी ओळ हिंदुत्वावर लिहून वाद आणि वादळं निर्माण करतात. हिंदुत्वाला किंवा हिंदुधर्माला बोकोहराम किंवा इसिसची उपमा देणं हे कंगनाबेननं जो अपमान केला तसंच आहे. काय केलं हिंदुत्वाने? काही लोकं चुकीचे वागले असतील. पण त्याची खापर हिंदुत्वार फोडणं ही मुर्खाची लक्षणे आहेत. व्यक्तिगत मतं असली तरी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 November 2021https://t.co/iYrzxkvZII#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2021
संबंधित बातम्या:
अनिल देशमुखांची ईडी कोठडी संपणार, जामीन मिळणार का?
मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू