नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : मणिपूर येथील हिंसा आणि दोन महिलांची नग्नधिंड निघाल्याच्या प्रकारावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात. मणिपूरचा विषय गंभीर आहे. त्यावर यूरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. पण मणिपूरच्या विषयावर आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे, असं सांगतानाच तुम्ही समान नागरी कायदा आणताय ना? आधी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
गेले 70 दिवस होत आले. मणिपूर शांत करता येत नाही. तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवत आहात. आधी मणिपूर शांत करा. मणिपूर हा देशाचा भाग आहे. मणिपूरमधील जनता देशाची नागरीक आहे. मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून मारलं जातंय. ही देशातील 140 कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणता ना? मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मणिपूरची हिंसा रोखता आली नाही. त्यामागचं कारण काय असावं? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ असतो. कोणत्याही स्वार्थाशिवाय ते काही करत नाही. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल. 80 दिवसानंतर पंतप्रधानांनी संसदेबाहेर भाष्य केलं. त्याला काय अर्थ आहे? तुम्ही आधी मणिपूरवर बोला. निर्भयाकांड झालं, तेव्हा संपूर्ण सरकार हलवलं होतं. पण मणिपूरच्या घटनेवर सरकार काहीच बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.
कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या मुंबईत सर्वच कोव्हिड सेंटरने उत्तम काम केलं आहे. डॉक्टर आणि नर्ससह कोव्हिड सेंटर चालवणारे लोक यांनी चांगलं काम केलं आहे. पेंडामिक अॅक्टनुसार काम केलं आहे. पण काही लोकांच्या पोटात गोळा उठला आहे. चांगलं काम केल्याचं त्यांना पाहवत नाही. लोकांचे जीव वाचवले. चांगलं काम केलं. त्याचा फायदा महापालिकेत आम्हाला होईल. त्यामुळे टार्गेटेड लोकांना पकडलं जात आहे. हा ज्याचा जवळचा तो त्याचा जवळचा आमचा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.
परवा अश्लील क्लिप आली. ती व्यक्ती फडणवीस यांच्या जवळची आहे. निकटवर्तीय. पंतप्रधानांच्या जवळचा आहे. मग त्यात त्यांचा सहभाग आहे का? असा सवालही त्यांनी पाटकर यांच्या मुद्द्यावरून केला.
यावेळी त्यांनी अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला. तुम्हाला खात्रीने सांगतो. ते भावी मुख्यमंत्री आहेत. भावी म्हणजे फार भावी नाहीत. काय घटना घडतात ते मला माहीत आहेत. मलाही राजकारण कळतं. शिंदे गटाने आता सत्य स्वीकारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.