जम्मू: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत जम्मूला आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत जम्मूत आले आहेत. राऊत पहिल्यांदाच जम्मूत आले आहेत. तसेच ते पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेतही सहभागी होणार आहेत. यापूर्वी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. भाजपला डिवचण्यासाठीच ठाकरे गट भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याची जोरदार चर्चा आहे. राऊत जम्मूत आले असले तरी काल रात्रीपासूनच जम्मूत पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसातही राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
खासदार संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघाल्याचं सांगितलं. जम्मूत रात्रीपासूनच पाऊस पडत आहे. माझं आज सकाळीच राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. तुम्ही पावसात चालू नका. गाडीत बसून या, असं राहुल गांधी यांनी मला सांगितलं. त्यावर मी म्हणालो, आम्ही चालू आपल्याबरोबर, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या यात्रेने चांगला संदेश दिला आहे. देशात चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. काल तुम्ही पाहिलं असेल पठाणकोटला हजारो तरुण जमले होते. या तरुणांच्या हातात मशाली होत्या. पेटलेल्या मशाली होत्या. मशाल हे काँग्रेसचं चिन्हं नाही. ते तर शिवसेनेचं चिन्हं आहे. पण तरुणांच्या हाती या धगधगत्या मशाली पाहून मला भरून आलं, असं राऊत म्हणाले.
देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. काल संध्याकाळनंतर सर्वत्र हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. त्यामुळेच जम्मूत पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होतोय. मी त्यासाठीच तिकडे निघालो आहे, असं त्यांनी सांगितलं.
राऊत जम्मूला जात आहेत. त्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानलाच जावं, असा चिमटा शिंदे गटाच्या नेत्यांनी काढला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या टीकेचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. पाकिस्तानात जा म्हणणाऱ्यांनी आधी काश्मिरी पंडितांचं दु:ख ऐकावं. जे आम्ही सातत्याने ऐकत आहोत. तिथे बसून खोक्यांचं राजकारण सोप्पं आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही मोदींची माणसं आहोत असं सांगणं ही मर्दुमकी नाही. स्वत: मोदी यांनी जी काश्मीरबाबत आश्वासने दिली आहेत ती पूर्ण झालेली नाहीत. म्हणून राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात यात्रा सुरू केली असली तरी मी या यात्रेत सहभागी होण्यासाठी काश्मीरची भूमी निवडली, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जम्मूत शिवसेना विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं.