नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जोपर्यंत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांना मंजुरी देत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर टीका करतच राहणार, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. राजभवन हा राजकीय अड्डा बनल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. (Sanjay Raut targets Maharashtra Governor over appointment of 12 mlc)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकारविरोधातील 100 प्रकरणे सादर केली. त्यावर राऊत यांना विचारलं असता त्यांनी थेट राज्यपालांवरच हल्ला चढवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला विरोधक गेले असतील. राज्यपालांना भाजपचे कार्यकर्ते म्हणण्यात गैर काय? असा सवाल करतानाच राज्यपाल कोश्यारी हे संघात होते. भाजपचे मुख्यमंत्रीही होते. त्यामुळे त्यांना भाजपचे कार्यकर्ते म्हटलं तर वावगं काय? मलाही कुणी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हटलं तर मला त्याचा अभिमानच वाटेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
भाजपच्या दबावाखाली फायलीवर सही नाही
राज्यपाल हे पद संवैधानिक आहेत. त्या पदाचा मान राखला पाहिजे, हे मला सुद्धा कळतं. पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणारच. जोपर्यंत राज्यपाल 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी देत नाही. तोपर्यंत आम्ही टीका करतच राहणार, असंही ते म्हणाले. राज्यपाल भाजपच्या दबावाखाली या फायलींवर सही करत नाही. या फाईलमध्ये असं काय आहे? त्यामुळे राज्यपाल या फायलीवर का सही करत नाही? असे सवालही त्यांनी केला.
राज्यपाल राज्य चालवतात का?
विरोधकांना भेटायचंच असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. राज्यपालांना कशाला भेटता? राज्यपाल काय राज्य चालवतात का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना भेटा. तुमचं म्हणणं त्यांच्यापुढे मांडा. चर्चा करा. त्यातून संवाद निर्माण होईल, असंही ते म्हणाले.
बदली रॅकेटची खिल्ली
दरम्यान, राऊत यांनी फडणवीसांनी केलेल्या बदली रॅकेटप्रकरणाच्या गौप्यस्फोटाची खिल्ली उडवली. दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी येत राहिलं पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आल्याचं कळलं. काही कागद घेऊन ते आले होते. ते कागदपत्रं काही गंभीर नव्हते. ते गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल. विरोधी पक्षनेत्याने गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करण्यात यावा. तो नीट वाचा. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काहीच नाही. सरकारने काही चुकीचं केलं अशी एकही ओळ नाही, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut targets Maharashtra Governor over appointment of 12 mlc)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/363zMEtrB4
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
संबंधित बातम्या:
फडणवीस बॉम्ब घेऊन आले, तो भिजलेला लवंगी फटाका निघाला, त्याला वातही नव्हती; राऊतांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं; फडणवीसांचा चिमटा
(Sanjay Raut targets Maharashtra Governor over appointment of 12 mlc)