प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आजच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून मजबूत युक्तिवाद केला जाणार आहे. शिवाय दोन्ही गटाकडून आयोगाला भक्कम पुरावेही दिले आहेत. त्यामुळे सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार हे आज सुनावणीला उपस्थित राहतील. पक्षाचा संस्थापक, अध्यक्षच उपस्थित राहणार असल्याने निवडणूक आयोगाची आज खरी परीक्षा ठरणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. शरद पवार दिल्लीत आलेले आहेत. ते आजच्या सुनावणीला उपस्थित राहतील असं दिसतंय. आम्हीही आमच्या सुनावणीला उपस्थित राहिलो होतो. आज प्रत्यक्ष शरद पवार उपस्थित राहतील. सुनावणीवेळी निवडणूक आयोगाचे तीन सदस्य समोर असतात. ज्या पक्षाच्या अध्यक्षावरच समोरच्या व्यक्तीने खटला दाखल केला आहे की, आमचा पक्ष खरा आहे, त्यांचा खरा नाही. त्या पक्षाचे अध्यक्ष समोर बसलेले असताना निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
ज्यांनी हा पक्ष स्थापन केला ते शरद पवार निवडणूक आयोगाच्या समोर बसलेले असतील. त्यांनी पक्ष स्थापन केला. त्यांनी लोकांना पदं दिली. त्यांनी लोकांना निवडून आणलं. आणि कुणी तरी समोर एक ऐरागैरा उभा राहतो आणि सांगतो हा त्यांचा पक्ष नाही. यामुळे निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी आहे, असं राऊत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या प्रकरणात स्पष्ट निर्ण दिला आहे. आमदार आणि खासदारांची फूट म्हणजे पक्षाची फूट नाही. हाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू होईल आणि हाच निर्णय आम्हालाही लागू होईल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था राजकीय दबावाखाली काम करत आहेत. राज्यकर्त्यांना हवे तसे निर्णय हवे तसे देतात ही या देशाच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. ती केव्हा तरी नष्ट करावीच लागेल, असंही ते म्हणाले.
संजय राऊत यांच्या भावावर खिचडी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते सर्वांना चौकशीला बोलावू शकतात. मुळात अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झालेला नाही. मी स्पष्ट सांगतो. कोण तरी ऐरागैरा नागडा उठतो आणि त्याच्या दबावाखाली गुन्हे दाखल केले जातात. खरं म्हणजे 100 लोकं का मेले. त्याची चौकशी ईडीने केली पाहिजे. तीन रुग्णालयात 100 लोकं का मेले याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.
मुंबईत त्यावेळी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोफत खिचडी आणि मोफत पुलाव दिले. महापालिका नंतर आली. आमच्यावर गुन्हे दाखल करणारे तेव्हा घरात वर तंगड्या करून पडले होते. बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. आम्ही डॉक्टर्स आणि नर्सेस पकडून आणत होतो. घराघरात चुली विझल्या होत्या.
त्या घरात अन्न मिळावं म्हणून हजारो लोकांना आम्ही रोज मोफत अन्न पुरवठा करत होतो. हे कसले गुन्हे दाखल करतात? काय हवं ते करा. आम्ही नोटिसांना घाबरत नाही. कोणीतरी उघडे नागडे लोकं महिलांचे शोषण करणारे यांच्या दबावाखाली पोलीस गुन्हे दाखल करतात, अशी टीका त्यांनी केली.