नवी दिल्ली: कृषी कायद्याच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो. तेव्हा मला ते प्रचंड अहंकारी वाटले. त्यांच्याशी चर्चा करताना पाच मिनिटातच माझा वाद झाला… ही प्रतिक्रिया काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षातील नेत्याची नाहीये. तर खुद्द मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींबाबत ही प्रतिक्रिया व्यक्त करून भाजपला घरचा आहेर दिला आहे. थेट भाजपच्याच नेत्याने आणि राज्यपालपदावरील व्यक्तीने मोदींवर निशाणा साधल्याने भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
हरियाणाच्या दादरी येथील स्वामी दयाल धाममध्ये माथा टेकवण्यासाठी सत्यपाल मलिक आले होते. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आलेल्या कटु अनुभवाला वाट मोकळी करून दिली. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि कृषी कायद्यांच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो. त्यावेळी पाचच मिनिटात माझा त्यांच्याशी वाद झाला. मला ते प्रचंड अहंकारी वाटले. मी त्यांना म्हटलं शेतकरी आंदोलनात 500 लोक मेले आहेत. त्यावर ते म्हणाले, माझ्यासाठी मेलेत का? मी म्हटलं, तुमच्याचसाठी मेले आहेत. तुम्ही राजा आहात. त्यावरून आमच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी मला अमित शहांना भेटायला पाठवलं, असं मलिक यांनी सांगितलं.
मोदींच्या सल्ल्यानुसार मी अमित शहांना भेटलो. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर लोगोने उनकी अक्कल मार रखी है, असं शहा म्हणाले. तुम्ही चिंता करू नका. भेटत रहा. कधी ना कधी त्यांना ही गोष्ट समजून येईल, असं शहा म्हणाले असल्याचं मलिक यांनी सांगितलं.
शेतकरी आंदोलन अजून संपलेलं नाही. फक्त स्थगित झालं आहे. शेतकऱ्यांवर अन्याय किंवा अत्याचार झाला असेल तर तो पुन्हा होऊ शकतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एमएसपीवर कायदेशीर हमी दिली पाहिजे. सरकारने प्रामाणिकपणा दाखवून शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे, असं सांगतानाच गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी राज्यपाल पदही सोडू, असंही त्यांनी सांगितलं.
सत्यपाल मलिक हे जाट समुदायातील आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांना बिहारचे राज्यपाल बनवलं होतं. राज्यपाल बनण्यापूर्वीही ते भाजपमध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे उचलतच होते.
मलिक यांनी जवळपास सर्वच विचारधारांशी संबंधित पक्षात काम केलं आहे. राममनोहर लोहियांपासून प्रेरित होऊन त्यांनी समाजवादी विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. 1974मध्ये त्यांनी बागपतमधून चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलातून निवडणूक लढवली होती आणि आमदार म्हणून विजयी झाले होते. 1980 ते 1992 पर्यंत ते राज्यसभेचे खासदारही होते. 1984मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना काँग्रेसने राज्यसभा सदस्यही बनवले. पण तीन वर्षातच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते 1988मध्ये व्हीपी सिंह यांच्या जनता दलात सामिल झाले. 1989मध्ये ते अलीगडमधून खासदार म्हणूनही निवडून आले होते.
2004मध्ये ते भाजपमध्ये आले. भाजपमधून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवला. मात्र माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे चिरंजीव अजित सिंह यांनी त्यांना पराभूत केले. ते 21 एप्रिल 1990 ते 10 नोव्हेंबर 1990पर्यंत केंद्रात राज्यमंत्री होते. बिहारचे राज्यपाल होण्यापूर्वी ते भाजपचे उपाध्यक्ष होते.
Open criticism by Governor #SatyaPalMalik. Prime Minister went arrogant about farmers died in the protest. Home Minister tells Prime Minister has lost sense.
Nation wants to know from @BJP4India @BJP4Maharashtra
about the state of PM & HM. #SatyaPalMalik #FarmersProtest pic.twitter.com/5wERQFnObp— Vidya Chavan (@Vidyaspeaks) January 3, 2022
संबंधित बातम्या:
NCB | उभ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची अखेर बदली
निवृत्त गुरुजींसाठी गजराज मागवले, हत्तीवर बसवून मिरवणूक काढली! असं या गुरुजींनी केलं काय होतं?