नवी दिल्ली: न्यायालयाने गर्भधारणेनंतरच्या (Pregnancy) 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यास अविवाहित महिलेला परवानगी दिली आहे. महिला अविवाहित आहे म्हणून तिला गर्भपाताला परवानगी नाकारू शकत नाही. तिलाही गर्भपाताचा कायदेशीर हक्क आहे, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. ‘लिव्ह इन रिलेशनशिप (Live In Relationship) मध्ये गरोदर राहिलेल्या महिलेने 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यास परवानगी मागत सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे परवानगी नाकारली गेली. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. तिच्या अपिलावर गुरुवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने अविवाहित (Unmarried) महिलेच्या हक्कांवर बोट ठेवत याचिकाकर्त्या महिलेच्या बाजूने आदेश दिला. महिलेचे लग्न झालेले नाही, या एकमेव कारणावरून महिलेला गर्भपात करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे खंडपीठ म्हणाले. याचवेळी तिला गर्भधारणेनंतरच्या 24व्या आठवड्यात गर्भपात करण्यास परवानगी दिली. याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करीत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गुरुवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. उच्च न्यायालयाने अविवाहितेला गर्भपातासाठी परवानगी नाकारण्याची गरज नव्हती, असे खंडपीठ म्हणाले.
याचिकाकर्त्या गर्भवती महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिल्ली एम्स रुग्णालयाच्या संचालकांनी शुक्रवारपर्यंत एमटीपी कायद्याच्या कलम 3 (2) (ड) अन्वये वैद्यकीय पथक नेमावे. या पथकाने केलेल्या तपासणीत गर्भवतीच्या जिवाला धोका नसल्याचे “आढळून आले तर ती महिला गर्भपात करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्या महिलेच्या गर्भपाताची प्रक्रिया एम्स रुग्णालयातच होईल व त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा लागेल, असेही खंडपीठाने अंतरिम आदेश देताना नमूद केले.