S Jaishankar : भारत मालदीव तणावाचे वातावरण असताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सध्या देशात चर्चा आहे. सामान्य नागरिकच नाही तर बॉलिवूडमध्ये ही त्यांचीच चर्चा आहे. बीग बी अमिताभ बच्चन त्यांच्या एका विधानाने खूप प्रभावित झाले. परराष्ट्रमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचे अमिताभ यांनी देखील कौतुक केले आहे. अलीकडेच जयशंकर यांनी मालदीवची खिल्ली उडवली होती आणि म्हटले होते की, बदमाश अब्जावधी रुपयांची मदत देत नाहीत.
‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाबद्दल बोलताना एस जयशंकर यांनी मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘शेजारी संकटात असताना मोठे बदमाश $4.5 अब्ज रुपयांची मदत देत नाहीत.’
कार्यक्रमादरम्यान एस जयशंकर म्हणाले की, ‘कोविडमध्ये बदमाश इतर देशांना लस पुरवत नाहीत.’ नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश आणि मालदीव या देशांसोबतचा भारताचा व्यापार आणि गुंतवणूक गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे, यावरही त्यांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केल्यानंतर त्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर मालदीव सरकारने त्यांना निलंबित देखील केले. पण तेव्हापासून भारत आणि मालदीवमध्ये तणावाचे वातावरण आहे. जानेवारीमध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू म्हणाले होते की, कोणत्याही देशाला ‘दादागिरी’ करण्याचा अधिकार नाही.
मुइज्जू सत्तेत आल्यापासून भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहे. कारण ते चीन समर्थक आहेत. सत्तेत आल्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष हे सुरुवातीला भारत भेटीवर येतात. पण मुइज्जू हे पहिल्यांदा चीन दौऱ्यावर गेले. त्यांनी भारत दौरा देखील टाळला आहे.
आता मालदीवमध्ये मदतकार्य करणारे जवळपास ८० भारतीय सैनिक आहेत. त्यांना देखील भारतात माघारी बोलवण्याचं आवाहन त्यांनी भारताला केले होते. चीनच्या पाठिंब्यामुळेच ते भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. पण असले तरी भारताकडून अजून ही चांगले संबंध राहावे म्हणून प्रयत्न सुरु आहेत. कारण हिंद महासागरात मालदीवचे स्थान भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.