बंगळुरू : कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमैया यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. सिद्धारमैया यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शानदार सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.
बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच त्यांच्यासोबत इतर आठ आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात दलित, मुस्लिम, लिंगायत आणि ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते. काँग्रेसने या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना निमंत्रण दिलं. मात्र, बसपा नेत्या मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी, बीजद नेते नवीन पटनायक यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं.
काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठं यश मिळालं होतं. काँग्रेसने कर्नाटकात 135 जागा मिळवल्या होत्या. कानडी जनतेने काँग्रेसला संपूर्ण बहुमत दिलं होतं. तर सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपला अवघ्या 66 जागा मिळाल्या होत्या. जेडीएसलाही अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
दरम्यान, राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा तिढा निर्माण झाला होता. सिद्धारमैया यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला होता. डीके शिवकुमार यांनीही या पदावर दावा सांगून हायकमांडच्या डोक्याला टेन्शन दिलं होतं. या दोन्ही नेत्यांना समजावण्याचा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रयत्न केला. पण त्यात तोडगा निघत नव्हता. या दोन्ही नेत्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशीही चर्चा केली. तरीही तोडगा निघाला नाही. अखेर सोनिया गांधी यांनी डीके शिवकुमार यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.