नवी दिल्ली : दिल्लीतल्या हायव्होल्टेज भेटीने सकाळपासून राज्याच्या राजकारणातला सस्पेन्स वाढवला होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच प्रश्न विचारला जात होता, तो म्हणजे शरद पवार आणि मोदी भेटीत (Sharad Pawar Pm Modi Meet) शिजलं काय? दोन बड्या नेत्यांच्या भेटीत चर्चा कोणत्या मुद्यावर सकाळपासून यावर जोरदार राजकीय प्रक्रिया उमटत होत्या. या भेटीनंतर खुद्द शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत या भेटीबाबत खुलासे केले आहेत. या भेटीत प्रामुख्याने तीन मुद्द्यावर बोलणं झालं. त्यात दोन मुद्दे तर राज्यातले अत्यंत महत्वाचे मुद्दे होते. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई(Ed Action on Sanjay Raut), या कारवाईबाबत पवारांनी थेट मोदींकडे तक्रार केली. तर दुसरा मोठा मुद्दा म्हणजे, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, या दोन्ही मुद्द्यात मोदी लक्ष घालतील अशी अपेक्षा पवारांनी बोलून दाखवली, तर ठाकरे सरकारमध्ये खांदेपालट (Thackeray Government Cabinet) होणार का? राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? अशा अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या. त्या चर्चांनाही पवारांनी एका झटक्यात ब्रेक लावला आहे.
येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होईल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केलं. मी यावर बोलू शकत नाही. कारण हा तीन पक्षाचा निर्णय आहे. हे तीन पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील. त्याविषयी मला माहीत नाही. मला फक्त एकाच पक्षाबाबत माहीत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादीत व्हॅकेन्सी आहे. पण सध्या तरी पक्षात कोणताही बदल करण्यात येणार नाही. रिक्त जागांबाबत पक्ष नेत्यांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलू, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मंत्रिंडळात बदलाच्या चर्चांना आता तुर्तास तरी ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार पवारांनी मोदींकडे केले असल्याचे सांगितले असले, तरी नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईवर कोणतीहीह चर्चा नाही, तसेच राज्यातील कारवायांबाबत मोदींशी चर्चा नाही झाली, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांबद्दल बोलताना, राष्ट्रवादी-सेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. राज्यात मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करणार, सध्या मविआ सरकारला कोणताही धोका नाही, आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.