Sharad Yadav Death : ज्योतिषाच्या सल्ल्याने राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली; शरद यादव यांचे हे किस्से माहीत आहे काय?

| Updated on: Jan 13, 2023 | 8:41 AM

1990मध्ये नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर लालूप्रसाद यादव हे काँग्रेसच्या बाजूने होते. शरद यादव यांनाही भाजपला पाठिंबा देणं मान्य नव्हतं.

Sharad Yadav Death : ज्योतिषाच्या सल्ल्याने राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली; शरद यादव यांचे हे किस्से माहीत आहे काय?
शरद यादव यांचे हे किस्से माहीत आहे काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं. शरद यादव यांच्या निधनाने राजकारणातील अजातशत्रू आणि समाजवादी विचारा खंदा पुरस्कर्ता नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गोल्ड मेडलिस्ट इंजिनीयर ते 11 वेळा खासदार असा शरद यादव यांचा प्रवास राहिला आहे. जयप्रकाश नारायण आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत शरद यादव यांनी समाजवादी विचारांचा पुरस्कार केला होता.

तुरुंगातच असताना खासदार बनले

शरद यादव हे 25 वर्ष 7 महिन्यांचे असतानाच खासदार झाले होते. जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन पेटलं होतं. त्यावेळी शरद यादव यांना मीसा कायद्यांतर्गत तुरुंगात टाकण्यात आलं होतं. सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधातील आंदोलनामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर शरद यादव दोनदा तुरुंगात गेले. एकदा सात महिन्यांसाठी तर दुसऱ्यांदा 11 महिन्यांसाठी. त्यावेळी ते सर्वोदयी विचाराचे नेते दादा धर्माधिकारी यांच्या संपर्कात आले होते. दादा धर्माधिकारी हे जयप्रकाश नारायण यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्याचवेळी काँग्रेसचे खासदार सेठ गोविंददास यांचं निधन झालं.

त्यामुळे जबलपूरमधील या रिक्त जागेवर शरद यादव यांना पीपल्स पार्टीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यावेळी शरद यादव तुरुंगात होते. 1974मध्ये जेपींनी शरद यादव यांना आपला पहिला उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. या निवडणुकीत यादव एक लाखाहून अधिक मताने विजयी झाले होते.

ज्योतिषाच्या सल्ल्याने निवडणूक

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर अमेठी लोकसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक झाली. त्यावेळी राजीव गांधी निवडणूक मैदानात होते. एका ज्योतिषाच्या सल्ल्याने चौधरी चरणसिंह यांनी शरद यादव यांना राजीव गांधींविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. शिवाय यादव यांना निवडणुकीत उतरवावं असा सल्ला नानाजी देशमुख यांनीही दिला होता.

या निवडणुकीत राजीव गांधी यांचा पराभव होईल. त्याचा थेट परिणाम केंद्र सरकारवर होईल, असं ज्योतिषाने नानाजी देशमुख आणि चौधरी चरणसिंह यांना सांगितलं होतं. त्यामुळेच यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. मात्र, या निवडणुकीत शरद यादव यांचा पराभव झाला होता.

एनडीएतून बाहेर पडले

1997-98ची ही गोष्ट आहे. जनता दलाच्या अध्यक्षपदी शरद यादव यांची निवड झाली होती. त्यामुळे लालूप्रसाद यादव नाराज झाले होते. चारा घोटाळ्यात तुरुंगात जाण्यापूर्वी लालूंनी जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. विशेष म्हणजे कोर्टाच्या देखरेखीखाली जनता दलाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. तरीही लालूंनी पक्ष सोडला.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1990 ते 1995 पर्यंत लालू प्रसाद यांनीच शरद यादव यांना दिल्लीत सर्वाधिक सपोर्ट केला होता. जनता दलातून लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, चमनभाई यादव आदी नेते बाहेर पडल्याचं शरद यादव यांना अखेरपर्यंत शल्य होतं.

1990मध्ये नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर लालूप्रसाद यादव हे काँग्रेसच्या बाजूने होते. शरद यादव यांनाही भाजपला पाठिंबा देणं मान्य नव्हतं. मात्र रामविलास पासवान आणि इतर नेत्यांच्या सांगण्यावरून ते भाजपसोबत जाण्यास तयार झाले.

2013मध्ये भाजपने मोदींना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवले. त्यामुळे बिहारमध्ये जनता दलाने एनडीएतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. शरद यादव तेव्हा एनडीएचे संयोजक होते. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर एनडीएतून बाहेर पडण्यास शरद यादव राजी नव्हते. पण तरीही नितीश कुमार यांच्या हट्टामुळे त्यांना एनडीएतून बाहेर पडावं लागलं.

गोल्ड मेडलिस्ट इंजिनीअर

शरद यादव यांचा जन्म मध्यप्रदेशचा. पण त्यांची कर्मभूमी बिहार आणि उत्तर प्रदेश राहिली. त्यांनी इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. ते इंजिनीअरिंगचे गोल्ड मेडलिस्ट होते. त्यांनी जबलपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजातून बीईची डिग्री घेतली होती.

11 वेळा खासदार

शरद यादव हे एक दोन नव्हे तर तब्बल 11 वेळा खासदार राहिले आहेत. विशेष म्हणजे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधून ते लोकसभेला निवडून आले आहेत. त्याशिवाय त्यांनी काही काळ राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.