नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. आम्ही उत्तर प्रदेशात चाचपणी करत आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधींना मी भेटणार आहे. उत्तर प्रदेशातील युतीबाबत चर्चा झाली तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या आघाडीच्या चर्चा मीडियात आहेत. आमच्यात काही अशी चर्चा झाली नाही. आम्ही मीडियातूनच या चर्चा वाचत आहोत. आज मी राहुल गांधींना भेटत आहे. त्याला तुम्ही कर्टसी व्हिजीट का म्हणत नाही? आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. काँग्रेस महाविकास आघाडीत आहे. आम्ही किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवत आहोत. तिन्ही पक्षाशी संवाद असावा वाटतो. त्यामुळे दिल्लीत असल्यावर एकमेकांना भेटून चर्चा करतो. राज्यातील राजकारण, सरकारचं कामकाज आणि देशातील घडामोडीवर यावेळी चर्चा होत असतात, असं सांगतानाच पाच राज्यात निवडणुका आहेत. आम्ही गोव्यात लढत आहोत. उत्तर प्रदेशात चाचपणी सुरू आहे. काँग्रेसही यूपीत लढत आहे. त्यामुळे राहुल गांधींशी उत्तर प्रदेशात लढण्याबाबत चर्चा झाली तर चर्चा करू, असं राऊत म्हणाले.
शिवसेना गोव्यात स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना तृणमूलच्या आघाडीत नाही. आम्हाला त्यांच्या आघाडीत जायचं नाही. गोव्यात काय होईल हे आम्हाला माहीत आहे. तिथे काय परिस्थिती होईल आम्हाला माहीत आहे. एकवेळ आम्ही स्वतंत्र लढू पण कोणत्या आघाडीत जायचं की नाही याचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं. गोवा आम्हाला जवळचा आहे. आम्ही अनेकदा निवडणुका लढवतोच. कार्यकर्त्यांची इच्छा असते निवडणुका लढवण्याची. आम्ही मागची निवडणूक युतीत लढलो. पण आम्हाला यश मिळालं नाही. आमचं काम सुरू आहे. पण योग्यवेळी निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यूपीएचा भाग बनायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. कोणाचा भाग बनल्याशिवायही आम्ही तीन पक्ष विकास आघाडी म्हणून सत्तेत आहोत. यूपीएत काय असतं? भिन्न विचाराचे पक्ष एकत्र येतात. किमान समान कार्यक्रमावर सत्ता स्थापन करतात. एनडीएही त्याच पद्धतीने चाललं. वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीएत विभिन्न विचाराचे पक्ष होते. राम मंदिराला विरोध करणारे पक्षही होते. यूपीएतही असे पक्ष होते. महाराष्ट्र विकास आघाडीतही भिन्न विचाराचे पक्ष आहेत. महाराष्ट्रात मिनी यूपीएचा प्रयोगच सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आम्ही यूपीएत जाणार की नाही याची कुणालाही राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर चिंता करायची गरज नाही. कुणीही मनावर ओझं घेऊ नका. यूपीएत जायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. आम्ही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत. उद्धव ठाकरे यांचं मत आघाडी मजबूत व्हावी असंच आहे. अधिकाधिका पक्षांनी त्यात यावं आणि समर्थ पर्याय निर्माण करावा ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, असं ते म्हणाले. आम्ही आल्यावरच यूपीए मजबूत होईल असं कोणी सांगितलं? आम्ही काँग्रेससोबतच आहोत. महाराष्ट्रात आणि संसदेतही एकत्र आहोत, असंही ते म्हणाले. प्रियंका गांधींसोबत उद्याच्या भेटीचं शेड्यूल आहे. पण त्या अजूनही उत्तर प्रदेशात आहेत. त्यांनाही भेटू, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना यूपीएत जाणार का? महाराष्ट्रात मिनी यूपीएच सुरु; राहुल गांधींच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचं वक्तव्यhttps://t.co/RbnShCdfOY#Shivsena | #BJP | #Cogress | #UPA
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2021
संबंधित बातम्या:
MLC Election : नागपूरमध्ये काँग्रेसच्या अडचणीत वाढ, बसपा पाठोपाठ एमआयएमच्या निर्णयानं टेन्शन वाढलं
कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा