सत्तासंघर्षाची सुनावणी पाहण्यास विदेशातून आल्या ‘या’ देशाच्या सरन्यायाधीश

| Updated on: Mar 16, 2023 | 5:00 PM

राज्यातील सत्तासंघर्षावर देशातील प्रसिद्ध आणि कसलेल्या वकिलांनी दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केला. या सुनावणीकडे देशाचे नाही तर विदेशाचेही लक्ष आहे. कारण विदेशातील एक सरन्यायाधीश सुनावणी पाहण्यासाठी आल्या.

सत्तासंघर्षाची सुनावणी पाहण्यास विदेशातून आल्या या देशाच्या सरन्यायाधीश
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी गुरुवारी पूर्ण झाली. महाराष्ट्रातील राजकारण अन् सर्वोच्च न्यायालयाकडे देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे? कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद अनेक नवीन वकिलांसाठी नाही तर कायदेतज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे. देशातील प्रसिद्ध आणि कसलेल्या वकिलांनी दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केला आहे. यामुळे शिवसेना नेमकी कुणाची खरी? कोणाचा दावा ठरणार योग्य? कोण खरं आणि कोण खोटं? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. कारण आज ही सुनावणी संपली आहे. परंतु ही सुनावणी पाहण्यासाठी विदेशातून एका राष्ट्राच्या सरन्यायाधीश भारतात आल्या. त्यांनी सर्व कामकाज पाहिले.

केनियाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश मार्था के कूमे सर्वोच्च न्यायालयात पोहचल्या. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पाहण्यासाठी त्या केनियातून भारतात आल्या. त्या जेव्हा न्यायालयात आल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुरु होती. या पाच सदस्यीय घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर.शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांचा समावेश आहे. ही सर्व सुनावणी त्यांनी पाहिली.

हे सुद्धा वाचा

न्या. चंद्रचूड यांनी केले स्वागत

केनियाच्या सररन्यायाधीश मार्था के कूमे आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व इतर न्यायमूर्तींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ वकीलही होते. न्या. चंद्रचूड यांनी म्हटले की, केनियाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीशांच्या उपस्थितीमुळे आम्ही भारावलो आहोत. मार्था यांनी केनियात अनेक ऐतिहासिक निकाल दिले आहेत. त्यांनी भारतीय संविधान आणि कायद्यावर चांगला अभ्यास केला आहे.

प्रतिनिधीमंडळाला दिली माहिती


केनियाच्या सरन्यायाधीश मार्था यांच्यांसोबत त्यांच्या देशाचे शिष्टमंडळही आले आहे. या प्रतिनिधी मंडळालाही ज्येष्ठ वकील कपिल सिब्बस आणि महेश जेठमलानी यांनी सत्तासंघर्ष खटल्याची माहिती दिली.

कोण आहेत कूमे


मार्था कुमे यांचा 3 जून 1960 रोजी केनियातील मेरू जिल्ह्यातील एका गावात जन्म झाला. मार्था कूमे यांनी सरन्यायाधीश होण्यापूर्वी अनेक वर्षे कायद्याचा अभ्यास केला. 1986 मध्ये त्यांनी केनिया स्कूल ऑफ लॉमधून एलएलबीची पदवी घेतली. 2010 मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठातून पब्लिक इंटरनॅशनल लॉ मध्ये मास्टर्स म्हणजेच एलएलएम केले. मार्था कूमे यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर 2003 मध्ये त्यांची लॉ फर्म सुरू केली. त्यापूर्वी त्या लॉ सोसायटी ऑफ केनिया (LSK) मध्ये कौन्सिल सदस्य होत्या.केनियातील संविधान आणि कायदेशीर सुधारणांमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.

निकाल कधी येणार

जस्टिस शाह हे येत्या 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. घटनापीठात त्यांचा समावेश होता. त्यामुळे ते निवृत्त होण्याआधी याबाबतचा निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. दरम्यान, दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. तब्बल नऊ महिन्यांनी ही सुनावणी संपली. आता फक्त निकालाची प्रतिक्षा आहे. निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.