अयोध्या: शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे येत्या 10 जून रोजी अयोध्या (ayodhya) दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे कालपासूनच अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरेंचा दौरा कसा असेल, यावेळी किती लोक उपस्थित राहतील याची रुपरेषा ठरवण्यासाठी हे दोन्ही नेते अयोध्येला आले आहेत. आज सकाळीच राऊत आणि शिंदे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवादही साधला. यावेळी मीडियाच्या विविध प्रश्नांची राऊत यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. मात्र, बृजभूषण सिंह आणि शिवसेनेची डील होती काय? असा सवाल पत्रकारांनी करताच राऊत प्रचंड भडकले. बृजभूषण सिंह हे नेते आहेत. ते कुणाच्या दबावात येतील असं वाटत नाही. त्यांच्यात आणि आमच्यात डील झाली असं तुम्ही कसं म्हणू शकता? असा संतप्त सवाल राऊत यांनी पत्रकारांना केला.
तुम्ही बृजभूषण सिंह यांना अधिक ओळखता. ते कुणाच्या दबावात येतील का? ते नेते आहेत. ते देशाच्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मल्ल आहेत. आम्ही त्यांना जवळून ओळखतो. आमच्यात त्यांच्यात कशी डील होऊ शकते? तुम्ही असं कसं म्हणू शकता? सिंह यांच्या मताशी तुम्ही सहमत नाही का? नसाल तर डीलची बात करा. तुम्ही भूमिपूत्र आहात. तुम्ही तर डीलवर बोलूच नये, असं राऊत म्हणाले. राज ठाकरेंना विरोध सर्वात आधी कुणी केला होता. ते योगी आदित्यनाथ यांना विचारा. भाजपला विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांचा एक दिवसाचा दौरा आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून अयोध्येबाबत शिवसेनेला आस्था आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोनदा अयोध्येत येऊन गेले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते अयोध्येत येऊन गेले. अयोध्येत आल्यावर आम्हाल ऊर्जा मिळते. आम्ही ऊर्जा घेऊन जातो तेव्हा महाराष्ट्रात आमच्या हातून देशासाठी सकारात्मक कार्य होतं. कोविडमुळे दोन वर्ष अयोध्येला येता आलं नाही. आता कोरोनाचं संकट टळलं आहे. त्यामुळे आलो, असं त्यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरे 15 जून रोजी अयोध्येत येतील. दुपारी पत्रकार परिषद घेतील. इस्कॉनच्या मंदिरात जातील. ते शरयूवर जाऊन आरती करतील. हा धार्मिक कार्यक्रम आहे. राजकीय शक्तीप्रदर्शन नाही. आम्ही एका आस्थेने येणार आहोत. राम मंदिराचा मुद्दा कधीच मार्गी लागला आहे. मंदिर तयार होत आहे. त्यामुळे राजकारणही संपलं आहे, असं ते म्हणाले. आमचे नगरसेवक यूपीचे आहेत. मीरा भायंदरमधून निवडून आले आहेत. उत्तर भारतीय लोक आमच्यासोबत काम करत आहेत, त्यामुळे उत्तर भारतीयांबाबतची आमची भूमिका काय हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.