पणजी: शिवसेना पूर्वी गोव्यात एक-दोन जागांवर लढत होती. आता एकदोन जागांवर लढण्याचे दिवस संपले आहे. आम्ही 22 जागांवर लढणार आहोत. कुणाशीही युती न करता आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे गोव्यात प्रचाराला येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी आजवर शिवसेनेचं गोव्यात डिपॉझिट जप्त का व्हायचं याची कारणमीमांसाही केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना पहिल्यांदा गोव्यात लढत नाही. बाळासाहेब असतानाही लढलो. पण कुणाबरोबर युती केल्याने 2 ते 3 जागा वाट्याला यायच्या. मागच्यावेळीही गोवा सुरक्षा मंचशी युती केली. त्यावेळी 3 जागा वाट्याला आल्या. तीन जागा अशा मिळाल्या की तिथे पक्षाचे काही काम नव्हते. तरीही आम्ही लढलो. अपयश आले. पण यावेळी 22 जागा लढत आहोत. आम्ही आमच्या बळावर लढतो आहोत, असं राऊत यांनी सांगितलं.
आम्ही स्वबळावर 22 जागा लढू. बहुमतासाठी 21 लागतात. त्यापेक्षा एक जागा अधिकची लढू. दोन- तीन जागांवर निवडणूक लढण्याचे दिवस संपले आहे. कुणाबरोबर युती करण्याची गरज नाही. मागच्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांना डिपॉझिट राखता आले नाही. कारण वाट्याला जागा ज्या आल्या त्या त्याच पद्धतीच्या होत्या. भाजप सुद्धा डिपॉझिट गमावत गमावत इथं पर्यंत पोहोचला आहे. काँग्रेसचंही अनेकदा डिपॉझिट जप्त झालंय. आपचंही डिपॉझिट जप्त झाले होते. लहान राज्य आहे, मतदान कमी होते, त्याचा हा परिणाम आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेवरच टीका केली. काँग्रेस फुटला. काही लोक तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. तृणमूल काँग्रेस हा पश्चिम बंगालचा पक्ष आहे. तृणमूलची आणि गोव्याची काही सांगड लागते का?, असा सवाल करतानाच इथे समविचारी पक्ष कुणी नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था इथे काय आहे ते आपण पाहतो आहोत. काँग्रेसचा एक मोठा गट तृणमूलमध्ये गेला. एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत आले तर मी समजू शकत होतो. थेट पश्चिम बंगाल? गोव्यात सध्या गंमती जमती सुरू आहेत. मागच्या निवडणुकीत आप उतरले होते. डिपॉझिट जप्त झाले. आता तृणमूल उतरते आहे. गोव्याची प्रयोग शाळा झालीय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
सगळ्या पक्षांबद्दल गोवेकर जनतेच्या मनात रोष आहे. एका पक्षाच्या भरवशावर लोक निवडून येतात आणि 24 तासात पक्ष बदलतात. आज गोव्यात भाजपचं सरकारच नाही. भाजपचे किती आमदार निवडून आले होते? सगळे काँग्रेसचे आमदार फोडले आणि सरकार बनवले. बेडूक उड्या मारण्याचं काम गोव्याच्या राजकारणात सुरू आहे आणि त्यामूळे गोव्याचे डबके झाले आहे. पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवायला हवा, रस्त्यावर जाब विचारायला हवा आणि शिवसेने ते काम करेल, असं त्यांनी सांगितलं.
गोव्यात भूमिपुत्र संकटात आहे. स्थानिकांना नोकऱ्या नाहीत. भूमिपुत्राना नोकऱ्या द्या असं एकतरी राजकीय पक्ष सांगतो आहे का? कारण त्यांना परप्रांतीयांची मते हवी आहेत. आम्ही हा विषय हातात घेत आहोत. कॅसिनो येऊ देणार नाही, असे मनोहर पर्रीकर म्हणाले होते. आज तेच कॅसिनो गोव्याचे मालक बनले आहेत. गोवा अमली पदार्थ विकणाऱ्या माफियांच्या विळख्यात आहे. काय करते आहे इथले सरकार?, असा सवाल त्यांनी केला.
मूळ भाजप नेत्यांना गोव्यात स्थान नाही. बाहेरून आलेले नेते राज्य चालवत आहेत. त्यांना काय इथले मुद्दे आणि हिंदुत्व माहीत नाही, असंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. गोव्यात भाजप विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न होईल असे वाटत नाही. गोव्यात ज्याच्या हाताशी 3 किंवा चार आमदार असतात तो स्वतःला गोव्याचा मालक समजतो. मुख्यमंत्र्यांना काही फरक पडत नाही तर मग काँग्रेस फोडण्याची गरज काय? गोव्यातल्या जनतेला बदल हवाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गोव्यात येतील. त्यानंतर गोव्यात राजकीय हालचाली वाढतील, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात प्रचाराला येणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम पश्चिम बंगालमध्ये सुद्धा गेली होती. ममता बनर्जी यांना धूळ चारून येणारच असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते. काही लोक केरळ तामिळनाडूत गेले होते. चांगली गोष्ट आहे. देवेंद्रजी इथे येणार असतील निवडणूक प्रमुख म्हणून तर मी त्यांना शुभेच्छा देतो. व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप असे काही नसतं. त्यांनी त्यांचे काम करावे, आम्ही आमचे काम करू. त्यांना निवडणूक लढवण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचा त्यांच्या पक्षाला नक्कीच फायदा होईल. गोव्यात भाजपात अनेक नेते उपरे आहेत. त्यांना अनुभव नाही. त्यामुळे फडणवीस यांच्याशी त्यांना जुळवून घेता येईल, असा चिमटाही त्यांनी काढला.
कॅप्टन अमरिंदर यांच्या विरोधात असंतोष होता. भाजप त्यांचं विरोधात आंदोलन करीत होते. ते अकार्यक्षम आहेत असे सांगत होते. आता अमरिंदर कार्यक्षम ठरणार का? भाजपचे उत्तम धोरण की 75 वयानंतर पक्षाचे काम करावे. अमरिंदर यांचे वय 79 आहे. भाजपला त्यांच्या भूमिकेत काँग्रेससाठी बदल करावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपचे पान हलत नाही हे काँग्रेसचे महत्व आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 30 September 2021https://t.co/YxYKSsEAi4#mahafast100newsbulletin #mahafast100news #marathinews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2021
संबंधित बातम्या:
(Shiv Sena to contest 22 seats for Goa Assembly election, says sanjay raut)