नवी दिल्ली : अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. दिल्लीत सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यावेळी ही मोठी कारवाई करण्यात आलीय. निलंबन झालेल्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, आणि तृणमूलच्या काही खासदारांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई निलंबित
शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पहायला मिळाला होता. 12 ऑगस्टला संसदेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत हायव्हेल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. त्या गोंधळावर सर्वत्र टीका झाल्याचंही पहायला मिळालं. त्यानंतर खासदारांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.निलंबितांमध्ये काँग्रेस, शिवसेना, तृणमूलच्या खासदारांचा समावेश आहे. गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 6 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यात शिवसेनच्या 2 खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदारांवरील कारवाईनंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसचे 6, शिवसेनेचे 2, तृणमूलचे 2 खासदार निलंबित
राज्यातही गेल्या अधिवेशनात निलंबनाची कारवाई
देशाच्या संसदेतही गेल्या अधिवेशनात मोठा ड्रामा पहायला मिळाला होता. तालिका अध्यक्षांचा माईक, खेचण्यापासून लॉबीत शिवगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भाजपच्या 14 आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेत अधिवेशनावर बहिष्कार टाकून विधान भवनाच्या बाहेर प्रतिविधानसभा सुरू केली होती. मात्र त्यावेळचे तालिका अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी मार्शल पाठवून प्रतिविधानसभाही उधळून लावली होती. आता पुन्हा राज्यातही हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे यंदाचं अधिवेशन कोणत्या मुद्द्यामुळे गाजणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.