नवी दिल्ली: मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदानकार्डाला आधारकार्ड लिंक करायला नको. यामागे केंद्र सरकारचा कुठला तरी कुटील डाव असू शकतो, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच काल राज्यसभेत जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा संताप, उद्रेक स्वाभाविक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपेत्तर राज्यात केंद्राकडून त्रास दिला जातोय असंही त्यांनी सांगितलं. तसेच सिंधुदुर्गात चारही नगरपरिषदेत युती यशस्वी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील गटबाजीत उद्धव ठाकरे लक्ष घालतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, काल राज्यसभेत नार्कोटिस बिलावरील चर्चेदरम्यान जया बच्चन यांनी सताधाऱ्यांवर जोरदार संताप व्यक्त केला होता. स्पीकरनी जया बच्चन यांना आठवण करुन दिली की नार्कोटिक्स बिलावर चर्चा होत आहे. यावर जया बच्चन म्हणाल्या की, मला बोलण्यासाठी संधी देण्यात आली आहे. आपण मोठ्या मुद्द्यांवर चर्चा न करता फक्त या बिलाच्या क्लॅरिकल एररवर चर्चा करत आहोत. नेमकं काय होत आहे? त्या म्हणाल्या की, तुम्ही कुणासमोर बीन वाजवत आहात? तुमचं वागणं असंच राहिलं तर तुमचे वाईट दिवस लवकरच येतील. यानंतर जया बच्चन यांना बोलण्यापासून थांबवण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘मला बोलूच देऊ नका. आम्ही सदनातही बसावं की नाही? आमचा गळा दाबून टाका’ असा संताप जया बच्चन यांनी व्यक्त केला.
तेव्हा एका सदस्याने जया बच्चन यांच्यावर वैयक्तिक टिका केली. त्यावेळी जया बच्चन चांगल्याच संतापल्या. ‘यावर कारवाई व्हावी. कुणी कसं काय वैयक्तिक टिप्पणी करु शकतं. इथं बसलेल्या एकाही खासदाराच्या मनात बाहेर बसलेल्या खासदारांबद्दल सन्मान नाही. तुमचे वाईट दिवस येतील. मी शाप देते’, असं जया बच्चन म्हणाल्या.
दरम्यान, काल मतदान कार्डाला आधार कार्ड जोडण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. आधारकार्ड मतदान कार्डाला जोडणं अनिवार्य बनवण्यात आलं आहे. हा स्वैच्छिक निर्णय असेल असं सांगत केंद्रीय विधी मंत्री किरेन रिजीजू यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. स्थायी समितीच्या शिफारशीनंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 21 December 2021#Fastnews #news #Headlinehttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/jYbWvQUahN
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2021
संबंधित बातम्या:
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली, राऊतांचं थेट आव्हान