बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आरोपींच्या चौकशीतून मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपींना बाबा सिद्दिकी यांच्यासह त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी यांनाही मारण्याचे आदेश बिश्नोई गँगकडून होते. आरोपी धर्मराज कश्यप आणि गुरुनैल सिंगनं चौकशीत पोलिसांना सांगितलंय की, सिद्दीकी पितापुत्रांना एकाचवेळी मारण्याचे आदेश होते. शनिवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान आमदार मुलगा झिशानच्या कार्यालयातून बाबा सिद्दिकी बाहेर पडले.
झिशान सिद्दिकीही वडील बाबा सिद्दिकींसोबत कार्यालयातून निघाले पण त्यावेळी फोन आला आणि ते परत कार्यालयात गेले. मात्र बाबा सिद्दिकी कार्यालयाच्या बाहेर पडून काही मिटर अंतरावर पार्क केलेल्या कारची वाट पाहत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांना आणखी मोहम्मद झिशान अख्तर या आणखी एका आरोपीचा शोध आहे. हा झिशान अख्तर बिश्नोई गँगचा सक्रीय मेंबर आहे. झिशान अख्तर आणि गुरुनैल सिंग हरियाणाच्या तुरुंगात होते. जेलमधून बाहेर पडल्यावर या दोघांना बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी मिळाली. पण बिश्नोई गँगकडून सुपारी देणारं कोण होतं, त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
हल्लेखोर दीड महिन्यांआधीच मुंबईच्या कुर्ल्यातल्या पटेल चाळीत आले होते..इथं त्यांनी भाड्यानं रुमही घेतली होती. याच ठिकाणी राहून बाबा सिद्दिकींच्या हत्येचा डाव रचत होते. बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणात आणखी 2 आरोपी फरार आहेत. मोहम्मद झिशान अख्तर हा मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. तर, ज्यानं बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडल्यात तो आरोपी शिवकुमार उर्फ शिवा गौतम फरार आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली असली तरी पोलिसांना या प्रकरणात इतर गोष्टींचीही शंका आहे. बाबा सिद्दिकी यांना १५ दिवसापूर्वी मारण्याची धमकी आली होती. ज्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. पण तरी देखील त्यांच्यावर हल्ला कसा झाला याबाबत चौकशी सुरु आहे. दुसरीकडे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता अभिनेता सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. सलमान खानला देखील याआधी अनेक वेळा मारण्याची धमकी आली आहे.