नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. रोजच या हत्याकांडाची वेगळी माहिती समोर येत आहे. माहिती हादरून टाकणारी असल्याने मनं गोठून जात आहेत. हातपाय सुन्न पडत आहेत. माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हेच या हत्याकांडातून दिसून आलं आहे.
आफताबची पोलिसांनी कसून चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिलीय. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी त्याला 10 तास लागले होते. त्यामुळे तो थकून गेला होता. त्यामुळे त्याने नंतर आराम केला. त्यानंतर बियर प्यायला. सिगारेट ओढली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे त्याने अनेक तास पाण्याने धुतले. त्यानंतर ऑनलाइन जेवण मागवलं आणि नेटफ्लिक्सवर सिनेमाही पाहिला.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिचा चेहरा जाळून टाकला. मृतहेदाची ओळख पटू नये म्हणून त्याने हे केलं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती मिळवण्यासाठी त्याने इंटरनेटवर सर्चही केलं. फरशीवरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी त्याने केमिकल आणि ब्लीच पावडरचा वापरही केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
श्रद्धा वालकर ही महाराष्ट्रातील पालघरची राहणारी होती. ती आफताबच्या संपर्कात आली होती. दोघे एका कॉल सेंटरमध्ये भेटले होते. घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने दोघांनी दिल्ली गाठली होती. येथील महरौलीतील एका फ्लॅटमध्ये दोघेही लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. लग्नाचा तगदा लावल्याने आफताबने तिची गळा दाबून हत्या केली.
त्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यासाठी त्याने मोठा फ्रिज खरेदी केला होता. रोज रात्री 2 वाजता उठून तो महरौली येथील जंगलात जायचा आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकायचा. तब्बल 20 दिवस हे असंच सुरू होतं.
या हत्याकांडानंतरही तो याच फ्लॅटमध्ये राहत होता. तसेच ऑनलाइन अॅपवरून जेवणाची ऑर्डर देत होता. मे महिन्यात त्याने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतरही तो 9 जूनपर्यंत तिचं सोशल मीडिया अकाऊंट चालवत होता.
तसेच तिच्या मित्रांशी गप्पा मारत होता. याच काळात तो इतर मुलींच्याही संपर्कात होता. त्यांना तो आपल्या घरी आणायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.