नवी दिल्ली : पत्नीने आपल्या पतीविरुद्ध खोटी फौजदारी तक्रार दाखल करणे हा पतीचा एक प्रकारचा छळच आहे, असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालया (Delhi High Court)ने दिला आहे. घटस्फोटा (Divorce)च्या एका प्रकरणात न्यायालयाने हा निर्वाळा दिला. याचवेळी संबंधित प्रकरणातील पतीला अशा खोट्या तक्रारीमुळे प्रचंड मानसिक यातना झाल्या, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. संबंधित हिंदू जोडप्यामधील विवाह न्यायालयाने मानसिक छळाच्या कारणावरून मोडीत काढला. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला. सध्याच्या खटल्यातील खोटे आरोप म्हणजे पती तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे केलेले अत्यंत स्पष्ट स्वरूपाचे चारित्र्य हनन आहे, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले. (Significant Delhi High Court verdict in divorce case)
पत्नीने अपीलकर्ता पती आणि त्याच्या कुटुंबाला गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्यासाठी सर्व काही केले, यावर खंडपीठानेही शिक्कामोर्तब केले. याचवेळी खंडपीठाने संबंधित हिंदू जोडप्याला घटस्फोट देण्यास नकार देणारा कुटुंब न्यायालयाचा आदेश रद्द केला. पत्नीच्या खोट्या तक्रारीमुळे पतीला मानसिक छळ झाला असावा, तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जाईल, याकडे कुटुंब न्यायालयाने दुर्लक्ष केले, असेही खंडपीठाने यावेळी नमूद केले आहे. वकील सुमीत वर्मा यांनी पतीच्या वतीने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले होते.
या प्रकरणातील जोडप्याचे मे 2008 मध्ये लग्न झाले होते. विवाहितेने लग्नाच्या तीन वर्षानंतर सासरचे घर सोडले. याचवेळी तिने महिला न्याय कक्षाकडे हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र तिचे हे सर्व आरोप उच्च न्यायालयात निराधार ठरले. याच आधारे उच्च न्यायालयाने अपीलकर्त्या पतीला घटस्फोट मंजूर करीत मोठा दिलासा दिला.
अपीलकर्त्या पतीविरोधातील तक्रारीच्या संदर्भात पोलिस स्टेशनला 30 ते 40 वेळा भेटी द्याव्या लागल्या. हा त्रासही उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना विचारात घेतला. या प्रकरणातील प्रतिवादी पत्नीने अपीलकर्ता पती व त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध निराधार फौजदारी तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक यातना झाल्या, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. हे जोडपे गेल्या 12 वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचे वैवाहिक नाते पुढे चालू ठेवण्याचा आग्रह म्हणजे दोन्ही पक्षांवर आणखी क्रूरता ठरू शकेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Significant Delhi High Court verdict in divorce case)
इतर बातम्या
धक्कादायक ! सपाचे प्रदेश सचिव आणि त्यांच्या पत्नीची हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट