मुंबई : भारतात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केलीय. राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे चिंतेच कारण ठरलं आहे. कोरोनाला थोपवायचं असेल तर लसीकरण हाच त्याच्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. राज्यासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसींचं मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रासह देशासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आलीय. कोरोना लसींसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरला आहे. अमेरिकेने कच्च्या मालावरील हे निर्बंध उठवावे, अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्विटरवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना टॅग करुन केली आहे (Adar Poonawala request to Joe Biden left embargo on vaccine raw material exports).
अदर पुनावाला नेमकं काय म्हणाले?
“आदरणीय जो बायडन सर, कोरोना विरोधाच्या या लढाईत आपण खरंच एकत्र लढत असू तर माझी कळकळीची एक नम्र विनंती आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेत रोखून ठेवण्यात आला आहे. कृपया कच्च्या मालावरील हे निर्बंध तातडीने हटवा, जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल”, असं अदर पुनावाला ट्विटरवर म्हणाले आहेत. मात्र, त्यावर अद्याप बायडन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
‘आताच कच्च्या मालाची जास्त आवश्यकता’
अदर पुनावाला यांनी चार दिवसांपूर्वी ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीत लसीच्या उत्पादनावरुन चिंता व्यक्त केली होती. “लसीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरला आहे. हाच सर्वात मोठा अडथळा आहे, ज्यामुळे उत्पादन वाढवणं आव्हान होऊन बसलं आहे. आम्हाला आताच कच्च्या मालाची सर्वात जास्त गरज आहे, ज्यामुळे भारत आणि जगाच्याही लसीची गरज पूर्ण होऊ शकते”, असं पुनावाला यांनी सांगितलं होतं (Adar Poonawala request to Joe Biden left embargo on vaccine raw material exports).
अमेरिका आणि युरोपची ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी भूमिका
जेव्हा अमेरिका आणि युरोपातील देशांना मदतीची गरज होती तेव्हा भारताने या देशांना भरभरुन मदत केली. मात्र, आता जेव्हा भारताला मदतीची गरज आहे तेव्हा अमेरिका आणि युरोपातील काही देश गरज सरो आणि वैद्य मरो, असं धोरण अंगीकरताना दिसत आहेत. कारण कोरोना लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा कच्च्या मालाचा साठा या देशांनी रोखून ठेवला आहे.
अमेरिका आणि युरोपचा अवसानघातकीपणा
‘वसुधैव कटुम्बकम्’ म्हणत भारताने साऱ्या जगाला दोन्हा हातांनी मदत केली. कुणाला हायड्रोक्लोरोक्वीन दिल्या तर कुणाला आणखी दुसरं महत्त्वपूर्ण औषधं दिले. अफगाणिस्तानसारख्या अनेक देशांना कोरोना काळात लाखो टन गहू सुद्धा दिला. मात्र, आज जेव्हा भारतावर बाका प्रसंग आला तेव्हा अमेरिका आणि युरोपने पुन्हा अवसानघातकीपणा दाखवला आहे. लसीकरणासाठी आवश्यक असणारा कच्चा माल अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी रोखून धरला आहे. ज्यावर पुनावाला यांनी चिंता व्यक्त केली आहे.
भारताची नेहमी मदतीची भूमिका, पण अमेरिकेकडून धमकीची भाषा
जेव्हा अमेरिकेत रोज हजारो लोक कोरोनाने मरत होते तेव्हा भारताने हायड्रोक्लोरोक्वीनच्या गोळ्या पाठवल्या. एकीकडे भारताची भूमिका मदतीची होती तर दुसरीकडे अमेरिकेच्या तोंडात धमकीची भाषा होती. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने औषधं नाही पाठवलं तर कारवाई करु, असे धमकी देणारे वक्तव्य केलं होतं.
भारताचे पोवाडे गाणारे आज सर्व गप्प
कोरोना हा लसीनेच बरा होईल आणि लसीसाठी भारताकडेच हात पसरावे लागतील, असं समोर आलं तेव्हा युरोप, अमेरिकासह साऱ्या जगानेच भारताचे पोवाडे गायला सुरुवात केली. ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमानाचा फोटो ट्विट करत भारताच्या लसीला संजीवनी म्हटलं. बोरस जॉन्सन हे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भारताचा दाखला देत होते. भारताच्या लस उत्पादनाच्या क्षमतेचं कौतुक करताना बिल गेट्स थकत नव्हते. मात्र, आज हे सर्व गप्प आहेत.
सीरम इन्स्टीट्यूटमध्ये दर महिन्याला सहा कोटी लसींचे उत्पादन
सध्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला सहा ते साडे सहा कोटी लसींचं उत्पादन होतंय. सध्या फक्त महाराष्ट्रच नाही तर ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसडमध्येही लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट दर महिन्याला दहा कोटी लस उत्पादनाचा विचार करतेय. पण त्यासाठी कच्च्या मालाच नसल्याने उत्पादन वाढीवर ब्रेक लागण्याची शक्यता आहे. फार्मासिटी क्षेत्रात अमेरिकेला कधीच कुणाचं वर्चस्व सहन झालेलं नाही. गरज सरो आणि वैद्य मरो हेच अमेरिकेचे परराष्ट्र धोरण राहिलं आहे. कोरोना काळात भारताच्या वाटेलाही तोच अनुभव येताना दिसतोय.
हेही वाचा : व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो?; अदर पूनावाला यांनी दिलं ‘हे’ कारण