माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन, ‘देशाच्या राजकारणाची मोठी हानी’

| Updated on: Sep 12, 2024 | 4:43 PM

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. येचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी 72 वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन, देशाच्या राजकारणाची मोठी हानी
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन
Follow us on

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (माकप) नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे. येचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी 72 वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनने त्रस्त होते. त्यांना 19 ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान आज दुपारी त्यांचं निधन झालं. सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 ला मद्रास (चेन्नईत) एका तेलुगू भाषिक ब्राह्मण परिवारात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या.

सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचं शिक्षण घेतलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमधील अटक होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी हे देखील होते.

सीताराम येचुरी हे जेएनयूमध्ये शिक्षण घेत असताना राजकारणात सक्रिय झाले होते. ते जेएनयू विद्यार्थी संघाचे तीनवेळा अध्यक्ष बनले होते. येचुरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांचं ते आंदोलन चांगलंच गाजलं होतं.

सीताराम येचुरी हे माजी सरचिटणीस हरकिशन सिंग सुरजीत यांच्या आघाडीला पुढे चालू ठेवण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी 1996 मध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. त्यांनी 2004 मध्ये यूपीए सरकारच्या स्थापनेदरम्यान आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राहुल गांधी यांच्याकडून दु:ख व्यक्त

सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “सीताराम येचुरी माझे मित्र होते. ते देशाच्या विचारांचे रक्षक होते. आम्ही भरपूर वेळ चर्चा करायचो. या दुख:द प्रसंगी सीताराम येचुरी यांच्या कुटुंबासोबत आणि त्यांच्या मित्र आणि समर्थकांसोबत माझ्या संवेदना आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

‘देशाच्या राजकारणाची मोठी हानी’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देखील सीताराम येचुरी यांच्या निधनाच्या वृत्तावर दु:ख व्यक्त केलं आहे. “सीताराम येचुरी यांचं निधन झाल्याचं समजल्यानंतर खूप दु:ख झालं. ते अनुभवी खासदार होते. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणाची मोठी हानी आहे. मी त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि सहकाऱ्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करते”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत