नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : देशातील अतिशय महत्त्वाचं ठिकाण मानलं जाणाऱ्या संसदेत आज अचानक दोन जण घुसले. ते प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात येतात. तिथे ते जोरदार घोषणाबाजी करतात आणि नंतर लक्ष वेधण्यासाठी स्मोक बॉम्ब फोडतात. त्यामुळे भर सभागृहात पिवळा धूर उडायला लागतो. अचानक सुरु झालेल्या या गोंधळामुळे काही खासदारही घाबरतात. नेमकं काय सुरु आहे, हे क्षणार्धासाठी समजत नाही. पण घटनेचं गांभीर्य ओळखून काही खासदार घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला पकडण्यासाठी धावतात. खासदार या तरुणाला पकडतात. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करतात. यावेळी या तरुणासोबत घोषणाबाजी करणाऱ्या महिलेलादेखील पोलिसांनी अटक केली.
संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. संसदेवर हल्ल्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी समोर येतात. या घटनेतील दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. यात महाराष्ट्रातील 25 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर दुसरी व्यक्ती ही हरियाणाची 42 वर्षीय महिला नीलम कौर सिंह आहे. हे दोन्ही जण एका खासदाराच्या पासवर संसदेत शिरले होते.
संसद हे देशाचं सर्वोच्च सभागृह आहे. त्यामुळे हे दोनही इसम या सभागृत स्मोक कँडल घेऊन कसे शिरले? असा प्रश्न उपस्थित होतोय. ही सुरक्षेतील सर्वात मोठी चूक आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान हे दोन्ही इसम ससंदेच्या सभागृहात शिरले कसे? याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही जण एका खासदाराच्या पासवर आतमध्ये शिरले, अशी माहिती समोर आलीय. मध्य प्रदेशच्या म्हैसूर मतदारसंघाचे खासदार प्रताम सिम्हा यांच्या नावाच्या पासने हे दोन्ही इसम आले होते. सिम्हा हे भाजप खासदार आहेत. त्यामुळे संसदेत घोषणाबाजी करणाऱ्या महाराष्ट्राच्या लातूरच्या तरुणाचं हे म्हैसूर कनेक्शन तर नाही ना? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.
भाजपचे खासदार प्रताप सिम्हा हे 42 वर्षांचे आहेत. ते पेशाने पत्रकार देखील होते. त्यांनी पत्रकारितेत मास्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. विजय कर्नाटक समचार येथून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या करियरला सुरुवात केली होती. प्रताम सिम्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक पुस्तक देखील लिहिलं आहे. ‘नरेंद्र मोदी : द अनट्रोडेन रोड’ असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रताम सिम्हा आणि अमोल शिंदे, नीलम कौर सिंह यांचं काही कनेक्शन आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.
या प्रकरणातील तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. त्याचे आई-वडील हे मजूर आहेत. अमोल शिंदे हा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. तो जेव्हापासून कॉलमध्ये शिक्षणासाठी जातोय तेव्हापासून तो घरी देखील गेलेला नाही. पोलीस अधिक्षकांनी अमोल शिंदे याच्याबद्दल अधिकची माहिती काढण्याचे आदेश दिले आहेत.