नवी दिल्लीः शिवसेना (Shiv Sena) नेत्यांचे घोटाळे उघड केले. त्यामुळे आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. ते गुरुवारी नवी दिल्ली येथे बोलत होते. भाजपचे शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले आहे. या शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह गोपाल शेट्टी, गिरीश बापट, खासदार मनोज कोटक, रक्षा खडसे यांचा समावेश आहे. त्यांनी केंद्रीय केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. सोमय्या यांच्यावर केलेला हल्ला हा गंभीर आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी खासदार मनोज कोटक यांनी केली आहे. याप्रकरणावर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या स्वतःच अडखळून पडल्याचे मत व्यक्त केले होते. एकीकडे शिवसेनेने हे प्रकरण किरकोळ समजून धसास लावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, दुसरीकडे भाजपने थेट दिल्लीचे दरवाजे ठोठावलेत. त्यामुळे यावरून राजकारण पुन्हा पेटणारय.
नेमके प्रकरण काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. पुणे महापालिका परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचे एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचेही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा ठरवून केलेला हल्ला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
काय म्हणाले सोमय्या?
किरीट सोमय्या नवी दिल्लीत म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांच्या कंपनीला उद्धव ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात कंत्राटे दिली. त्याचा घोटाळा बाहेर काढल्यामुळे शिवसैनिकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मदतीने संगनमत करून हा कट रचला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर खासदार मनोज कोटक यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसाकंडून त्रुटी
किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिका कार्यालयात हल्ला झाला. त्यावेळी पुणे पोलिसांकडून सोमय्या यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या. सोमय्या यांच्या सुरक्षेतील चुकांची दुरुस्ती करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तर राज्यात कोविड घोटाळे झाले. पीएमआरडीएने पुणे महापालिकेने नाकारलेल्या लोकांना कंत्राटे दिली गेली, असा आरोपही खासदार कोटक यांनी केला आहे. त्यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही यावेळी केली आहे.
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?