टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना, त्यातील राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या ऐन भरात आला आहे. या दोन्ही राज्यात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत आहेत. त्यामुळे अर्थात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एकीकडे भाजपचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नेहमीच्या भाषणशैलीत काँग्रेसवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या मवाळ आणि संयमी भाषेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश येथील प्रचाराचं हे वातावरण तापलं असतानाच, काँग्रेस नेते राज बब्बर, विलास मुत्तेमवार व इतर काही जणांनी मोदींच्या आई-वडिलांची उदाहरणं देत सभांमध्ये काही मुद्दे मांडले. हाच धागा पकडत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने मला शिवीगाळ केली जाते आहे, माझ्या आई-वडिलांवर राजकीय हेतूने टीका केली जाते आहे, असे नरेंद्र मोदी म्हणू लागले आहेत. मात्र, मोदींच्या आई-वडिलांना खरंच कुणी शिवीगाळ केली का, की केवळ मोदी या सगळ्या गोष्टींचा प्रचारासाठी राजकीय वापर करत आहेत? टीव्ही 9 मराठीच्या डिजीटल टीमने या संपूर्ण प्रकरणाचे काही अंग तपासले आहेत. पाहूया मोदींच्या विधानात किती तथ्य आहे आणि विरोधकांनी खरंच मोदींच्या आई-वडिलांना शिवीगाळ केलीय का :
सर्वप्रथम आपण, नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? ते पाहूया. त्यानंतर त्यांचं वक्तव्य ज्या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर टीका करणारं आहे किंवा उत्तर देणारं आहे, त्यांची वक्तव्य आपण तपासण्याचा प्रयत्न करुया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
मध्य प्रदेशातील विदिशा, छतपूर आणि मंदसौर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (24 नोव्हेंबर) प्रचारसभा घेतल्या. या सभेत ते म्हणाले, “काँग्रेसकडे आता बोलण्यासाठी कोणतेच मुद्दे नाहीत. म्हणून ते माझ्या आईला शिव्या देण्याचं राजकारण करत आहेत.”
पंतप्रधान पुढे म्हणाले, “ज्यांच्या बाजूने सत्य नसतं, जे असंस्कृत असतात, ते मुद्दा सोडून तुमच्या-आमच्या आईवर बोलू लागतात. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे ज्या पक्षाने सत्ता गाजवली, त्यांच्या नेत्यांनी मोदींशी भिडण्याऐवजी मोदींच्या आईला शिवीगाळ करत आहेत. मोदींशी मुकाबला करण्याची ताकद नाही.”
विदिशा येथे सभेत बोलताना मोदी म्हणाले, “आज मी टीव्ही, सोशल मीडियावर पाहिलं, माझ्या आईला शिवीगाळा केली जात आहे. माझ्या वडिलांना राजकारणात ओढलं जात आहे. माझे वडील 30 वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले आहेत. माझ्या घरातील गेल्या 100 पिढ्यांमधील कुणीच राजकारणाशी संबंधित नव्हतं. माझे वडील लहानशा गावातील गरीब कुटुंबातील होते. त्यांचं नाव राजकारणत ओढण्याचं कारण काय? आणि आम्ही कुणाही वैयक्तिक नेत्याला बोलत नाहीत. तर देशाच्या माजी पंतप्रधानांना आणि काँग्रेस नेत्यांविरोधात बोलतो.”
#WATCH: PM Modi says in Vidisha, “kya kaaran hai ki aaj mere pita ji ko bhi ghasit ke le aaye, jo 30 saal pehle duniya chod ke chale gaye hain. Aur Congress ke naamdaar kehte hain ki Modi Ji bhi to mere parivar ke liye bolte hain”. #MadhyaPradesh pic.twitter.com/qO18PXvEv3
— ANI (@ANI) November 25, 2018
तसेच, काँग्रेस पक्षाने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळेच काँग्रेसचे नेते शिवीगाळ करु लागले आहेत, असेही मोदी म्हणाले.
कोणत्या काँग्रेस नेत्यांमुळे मोदींनी शिवागाळीचा मुद्दा उपस्थित केला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मुद्दे प्रकर्षाने मध्य प्रदेश आणि राजस्थानात मांडले. ते म्हणजे, ‘आईला शिवीगाळ’ आणि ‘वडिलांवरुन राजकारण’. आता नरेंद्र मोदी यांनी हे मुद्दे कुठल्या नेत्यांच्या विधानांवरुन मांडले, हे टीव्ही 9 मराठीच्या डिजीटल टीमने शोधण्याचा प्रयत्न केला. यात प्रामुख्याने दोन काँग्रेस नेत्यांची विधानं समोर आली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांचं एक विधान आणि दुसरे विधान, नागपुरातील काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांचे एक विधान.
आता आपण राज बब्बर आणि विलास मुत्तेमवार या दोन्ही नेत्यांची विधानं तपासून पाहू. त्यात त्यांनी मोदींच्या आईला शिवी दिली आहे का, आणि वडिलांचं नाव राजकारणात आणलं आहे का, ते पाहूया. त्यांची विधानं आम्ही इथे जशीच्या तशी देतो आहोत :
काँग्रेस नेते राज बब्बर काय म्हणाले?
23 नोव्हेंबर 2018 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेते राज बब्बर म्हणाले, जेव्हा ते (मोदी) म्हणतात की, डॉलरच्या समोर रुपया इतका खाली गेला की, तत्कालीन पंतप्रधानांच्या वयाजवळ जात होता. मग आजचा रुपया हा तुमच्या पूजनीय आईच्या वयाच्या जवळ जाणं सुरु झालं आहे.”
काँग्रेसच्या काळात ज्यावेळी रुपयात घसरण झाली, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वयाशी मोदींनी रुपयाची तुलना केली होती. तोच धागा पकडून काँग्रेस नेते राज बब्बर यांनी आताच्या रुपयाची घसरण मोदींच्या आईच्या वयाशी केली. राज बब्बर यांच्या या टीकेवरुन मोदींनी काँग्रेसला निशाणा करत, काँग्रेस नेते आपल्याला शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला.
Jab vo (PM Modi) kehte te ki dollar ke samne rupaya itna gir gaya ki uss waqt ke PM ki umar batha karke kehte te ki unki umar ke kareeb ja raha hai.Aj ka rupaya,apki pujniye mataji ki umar ke kareeb niche girna shuru hogaya hai:Raj Babbar,Congress,in Indore,MadhyaPradesh. (22.11) pic.twitter.com/5vTv0c2sKb
— ANI (@ANI) November 22, 2018
काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार काय म्हणाले?
24 नोव्हेंबर 2018 रोजी राजस्थानमधील बारमेरमध्ये काँग्रेसची प्रचारसभा झाली. त्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटले, “पंतप्रधान बनण्याआधी तुम्हाला कोण ओळखत होतं? आजही तुमच्या वडिलांचं नाव कुणाला माहित नाही. राहुल गांधींच्या वडिलांचं नाव सगळ्यांना माहित आहे.”
काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करुन, विनाकारण टीका केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. याचे कारण असे की, नरेंद्र मोदी यांचे वडील राजकीय क्षेत्रात सक्रीय नव्हते. ते सार्वजनिक जीवनात नव्हते. तरीही मुत्तेमवार यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख केला. यावरुनच पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसवर घणाघाती टीका करत, आपल्या वडिलांवरुन राजकारण करत असल्याचा आरोप केला.
#WATCH: Congress’ Vilasrao Muttemwar says in Rajasthan’s Barmer,”tumhe kaun kal tak janta tha desh ka Pradhan Mantri banne ke pehle.Aaj bhi tumhare baap ka naam koi jaanta nahi. Rahul Gandhi ke baap ka naam sab log jaante hain…Ye Narendra, uske pita ji ko to chod hi do”.(24.11) pic.twitter.com/Xf6PEUjPyj
— ANI (@ANI) November 25, 2018
एकंदरीत, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीमच्या तपासात असे लक्षात आले आहे की, काँग्रेस नेते राज बब्बर यांनी जशास तसे उत्तर म्हणून मोदींच्या आईच्या वयाचं उदाहरण दिलं, तर विलास मुत्तेमवार यांनी मोदींवर टीका म्हणून वडिलांचं नाव राजकारणात आणलं आणि हाच धागा पकडत मोदींनी आता काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.