ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचर अजूनही थांबलेला नाही. केंद्र सरकार आता या मुद्द्यावर ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी गृह मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याआधी गृहमंत्र्यांनी काल मणिपूरच्या राज्यपालांचीही भेट घेतली होती. हिंसाचार संपवण्यासाठी या बैठकीत काही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.
मणिपूरमधील परिस्थितीबाबत गृहमंत्रालयात आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, पुढील लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, मणिपूरचे डीजीपी राजीव सिंह, माजी सीआरपीएफ प्रमुख आणि मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग या बैठकीला उपस्थित नव्हते.
गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला गेला. ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीत मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्याबाबत चर्चा झाली. एनसीआरबीचे डीजी विवेक गोगिया हे देखील गृह मंत्रालयात उपस्थित होते.