उदयपूर: गेल्या तीन दिवसांपासून उदयपूरमध्ये (Udaipur) काँग्रेसचं संकल्प शिबीर सुरू आहे. या शिबीरात पाच राज्यातील पराभव आणि काँग्रेसची पुढील वाटचाल यावर चर्चा सुरू आहे. आज या शिबिराचा सांगता समारंभ होता. या तीन दिवसात संकल्प शिबिरात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. एक कुटुंब एक तिकीटपासून ते गाव तिथे काँग्रेसचे (Congress) कार्यालय मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. आज शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. हम जीतेंगे… हम जीतेंगे… हाच संकल्प आपल्याला करायचा आहे, असं सांगत सोनिया गांधी यांनी पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी काँग्रेसच्या कार्य समितीच्या सदस्यांची एक सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल. तसेच पक्षात सुधारणा घडवून आणण्यासाठी एका टास्क फोर्सचीही निर्मिती करण्यात येणार आहे, असंही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं.
तीन दिवस चाललेल्या समितीच्या शिफारशींची वेगाने अंमलबजावणी केली जाणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू करणार असल्याची घोषणाही सोनिया गांधी यांनी केली. या यात्रेत तरुण कार्यकर्त्यांसह माझ्यासारखे ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत. लोकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं आणि संविधानाचं संरक्षण करण्याचं काम हा रॅलीतून करण्यात येणार आहे, असं सोनिया गांधींनी स्पष्ट केलं.
ही यात्रा सामाजिक सद्भावाची यात्रा आहे. देशात सध्या समाजिक सलोखा कमकुवत झाला आहे. संविधानाची मूलभूत मूल्य संरक्षित करण्याचं आणि लाखो लोकांच्या वेदना दूर करण्याचं काम या यात्रेतून करण्यात येणार आहे. आपण जिंकणारच… आपण जिंकणारच… हाच आपला संकल्प आहे. तसेच येत्या 15 जूनपासून जन जागरण यात्रेचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात येणार आहे. या अभियानातून आर्थिक मुद्दे लोकांसमोर आणण्याचं काम करेल. बेरोजगारी आणि महागाईसारख्या मुद्द्यांवरून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कार्यकर्त्यांशी संबोधित केलं. आपली लढाई ही विचारधारेची लढाई आहे. जनतेशी आपलं कनेक्श तुटलं आहे. हे कनेक्शन पुन्हा एकदा जोडायचं आहे. केवळ काँग्रेसच देशाला पुढे घेऊन जाऊ शकते हे जनतेला माहती आहे. काँग्रेस आणि जनतेचं नातं पूर्वी जसं होतं, तसंच हे नातं केलं जाईल, असं राहुल गांधी म्हणाले. हिंसा आणि द्वेष निर्माण करणाऱ्या संघ आणि भाजपच्या विचारधारेशी आमचा लढा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.