देशाच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाचा (15th President of India) मान मिळाला आहे. मुर्मू यांना 2015 साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला होता. एक सर्वसामान्य आदिवासी महिला (Tribal women)ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतचा मुर्मू यांचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. अतिशय साधं विनम्र जीवन जगणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचे राहणीमानही साधं आहे. त्यांचा पेहराव, संथाली साडीही सध्या चर्चेत आहे. संथाली डिझायनर उत्कलमृता यांच्याकडून या साडीचे डिझाइन, त्याबद्दलच्या विशेष गोष्टी जाणून घेऊया.
द्रौपदी मुर्मू या पीच, क्रीम किंवा गुलाबी या सारख्या फिकट रंगाची संथाली साडी नेसतात. नाकात चमकी, गळ्यात चेन, छोटेसे कानातले आणि गोल्डन रिमचा चश्मा असा साधा पेहराव द्रौपदी मुर्मू यांचा असतो.
मुर्मू या जी साडी नेसतात ती संथाली साडी ही हँडलूम प्रकारातील ( हाताने बनवलेली) आहे. वेगवेगळ्या रंगाचे धागे हाताने एकमेकांमध्ये गुंफून ही साडी तयार होते. पूर्वीच्या काळी या, संथाली साडीवर धनुष्य आणि बाणाचे डिझाइन विणलेले असायचे. साडीवरील हे डिझाइन म्हणजे स्त्री स्वातंत्र्याच्या इच्छेचे प्रतीक होते. मात्र आता या साड्यांवर मोर, फुलं, बदक अशी वेगवेगळी डिझाइन्स वा नक्षीकाम केलेले दिसते.
पारंपारिक पद्धतीने ही साडी तयार केली जाते. पांढऱ्या रंगाच्या कॉटनच्या कापडावर रंगीबेरंगी दोऱ्यांनी ‘चेक्स’ (डिझाइन) विणले जाते. मात्र ही साडी केवळ काही खास प्रसंग वा समारंभांदरम्यानच नेसली जाते. संथाली आदिवासी समाजात लग्न समारंभादरम्यान ही साडी नेसत नाहीत. त्याऐवजी पिवळ्या वा लाल रंगाची साडी नेसतात किंवा भेट दिली जाते.
मयुरभंज जिल्ह्यातील फुटा / फोडा येथे या साड्या तयार केल्या जातात. संपूर्णपणे हाताने विणलेल्या ( हँडलूम) कॉटनच्या या साडीसाठी कमीत कमी धाग्यांचा वापर केला जातो. ओडिशामधील संथाल आदिवासी, या साड्या तयार करतात आणि म्हणूनच त्या साड्या ‘संथाली’ नावाने ओळखल्या जातात.
ओडिशामधील स्थानिक बाजारात या साड्यांची किंमत 1000 ते 5000 रुपयादरम्यान असते. मात्र ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ही साडी खरेदी करायची झाल्यास ब्रँडनुसार, तिची किंमत वाढत जाते.